
नवी दिल्ली एका खासगी कॅबमध्ये तरुणीसमोर हस्तमैथुन करणाऱ्या एका विकृत चालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तरुणी गुडगावहून दिल्लीला एका खासगी कॅबमधून येत असताना हा प्रकार घडला आहे. एका २५ वर्षीय वकील तरुणीने दिल्ली हायकोर्टात येण्यासाठी गुडगावहून मोबाइल अॅपद्वारे खासगी कॅबचे बुकिंग केले होते. तरुणी कॅबच्या मागील सीटवर बसली होती. काही वेळानंतर कॅबचा चालक कारमधील आरशामधून वारंवार आपल्याला पाहत असल्याचे तरुणीच्या निदर्शनास आले होते. पण तरुणीने त्याकडे कानाडोळा केला. विकृत चालक इथवरच थांबला नाही. त्याने कार चालवत असतानाच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. चालकाच्या या प्रकाराने तरुणी पुरती घाबरली. गुरुवारी संध्याकाळी सुमारे ४ वाजता चालकाने तरुणीला दिल्ली हायकोर्टाच्या बाहेर सोडले आणि नराधम चालक तिथून निघून गेला. त्यानंतर तरुणीने तातडीने १०० क्रमांकावर पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे विकृत चालकाला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कॅबच्या चालकाने आपल्याला पाहून विकृत चाळे करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारदार तरुणीने सांगितले आहे. कॅब चालकाने तरुणीशी कोणताही संवाद अथवा छेडछाड केली नाही. पण तिला पाहून प्रवासादरम्यान त्याने विकृत चाळे त्याने सुरु केले, असे तरुणीने सांगितल्याचं पोलीस म्हणाले. तरुणीने दिलेल्या गाडी आणि मोबाइल क्रमांकाच्या आधारे आरोपी चालकाला अटक करण्यात आली. याशिवाय, त्याची कारही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.