मध्य प्रदेशातही रात्रीस खेळ! काँग्रेस आमदार भाजपच्या जाळ्यात? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 4, 2020

मध्य प्रदेशातही रात्रीस खेळ! काँग्रेस आमदार भाजपच्या जाळ्यात?

https://ift.tt/2TDy7zs
नवी दिल्ली : मध्यप्रदेशचे काँग्रेसचे तब्बल आठ आमदार दिल्लीत पोहचल्यानंतर एकच राजकीय भूकंप आलाय. या भूकंपानं मंगळवारी रात्री कमलनाथ सरकारच्या खुर्चीला हादरा दिला. या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली आणि गुडगाव होता. भाजप आणि काँग्रेसमध्ये रात्रभर जोरदार ड्रामा सुरू राहिलेला दिसला. नेमकं काय घडलं रात्री? भोपालच्या स्थानिक वर्तमानपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश भाजपचे काही वरिष्ठ नेते काँग्रेस आमदार बिसाहू लाल सिंह, हरदीप सिंह, अपक्ष आणि बीएसपीच्या आमदारांसोबत दिल्लीतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. सायंकाळी उशिरा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान दिल्लीत दाखल झाले. यामुळे भोपाळमध्ये कमलनाथ सरकार बेचैन झालं आणि एका राजकीय नाट्याच्या पहिल्या अंकाला सुरूवात झाली. काँग्रेस आणि इतर आमदारांना दिल्लीतून मानेसरच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवण्यात आलं. आपल्या खुर्चीला धोका असल्याचं जाणवल्यानं कमलनाथ यांनी आपल्या आमदारांच्या सोडवणुकीसाठीआपल्या चार मंत्र्यांना ताबडतोब दिल्लीला धाडलं. काँग्रेसचे मंत्री हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर आमदारांच्या सोडवणुकीसाठी जोरदार हंगामा झाला. त्यातच भाजप नेत्यांनी हॉटेलमध्ये पोलिसांनाही बोलावून घेतल्याचं समजतंय. त्यानंतर या नाट्यात काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांची एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं. दिग्विजय सिंहदेखील हॉटेलवर दाखल झाले. रात्री २ वाजता भाजप आणि काँग्रेस दरम्यान झालेल्या या गोंधळात बीएसपी आमदार रमाबाई काँग्रेस नेत्यांसोबत निघून गेल्या. इतर हॉटेलमध्येच थांबलेय. हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर बिसाहू लाल सिंह आणि रमाबाई यांच्याशी संपर्क करण्यात आला, भाजपला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर रमाबाई आमच्यासोबत आल्या, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय.