
अहमदनगर: नगर शहरातील एकाच कुटुंबातील एक महिला व चार पुरुष, अशा पाच जणांना झाल्याचे समोर आले आहे. हे कुटुंब सथ्था कॉलनी भागात राहत आहे. याशिवाय येथील आणखी दोन व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या तब्बल ७ ने वाढली असून १२४ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी (२८ मे) एका करोनाबाधित महिलेने जन्म दिलेल्या दोन्ही जुळ्या मुलांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. करोनाने आता संपूर्ण नगर जिल्हा व्यापला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये करोनाबाधित रुग्णाची नोंद झाली असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यातच आज सकाळी आणखी सात जणांना करोना झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये नगर शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने जिल्हा प्रशासनाने सथ्था कॉलनी परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या कॉलनीकडे जाणारे रस्ते सील करण्यात येत आहे. तसेच या पाच जणांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे. त्या जुळ्यांची प्रकृती उत्तम करोनाबाधित महिलेने जन्म दिलेल्या त्या दोन्ही जुळ्या मुलांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. या दोन्ही मुलांना सुद्धा आयसीयु मध्ये ठेवण्यात आले असून जिल्हा रुग्णालयाचे पथक त्यांची सध्या देखरेख करीत आहे.