मुंबई: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याप्रमाणेच केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही मुंबईच्या लोकलमधून प्रवासास मुभा देण्यात आल्याचा दावा भाजपचे आमदार यांनी केला आहे. मात्र, रेल्वेने हा दावा फेटाळल्याचं सूत्रांनी सांगितलं. ( allowed to use ) आशिष शेलार यांनी एक ट्विट करून संरक्षण विभाग, आयकर, जीएसटी, कस्टम आणि पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना मुंबईच्या लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी दिल्याबद्दल शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभारही मानले आहेत. रेल्वे मंत्रालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पत्र लिहून शेलार यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. आपली ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याचा दावा शेलार यांनी केला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी देणाऱ्या आदेशाचं पत्र केंद्र सरकारनं राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर आमच्याकडे रेल्वे मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत सूचना आली नसल्याचं सांगत रेल्वेने शेलारांचा हा दावा फेटाळून लावला आहे. मात्र, आज रेल्वेची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, तब्बल दोन महिन्यानंतर १५ जून रोजी मुंबईत पहिली लोकल धावली होती. केवळ राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सुरू करण्यात आलेली आहे. इतर सामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्कॅनिंग केल्यानंतर त्याच्याकडील ओळखपत्रं पाहिलं जातं. त्यानंतरच त्याला रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळता यावेत म्हणून एका फेरीत केवळ ७०० प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच रेल्वेतून प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय पश्चिम रेल्वेच्या लोकल चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर व त्यानंतर दहिसर ते विरार दरम्यान सर्व स्थानकांवर थांबविण्यात येत आहेत. 'रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या ठिकाणी प्रवासी रांग, थर्मल स्क्रीनिंग करण्याची जागा, पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी आवश्यकतेनुसार बंदोबस्त करावा', असे आदेश रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून सर्व रेल्वे पोलिसांना देण्यात आले होते, त्यानुसार रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.
https://ift.tt/3i8GiPY