म.टा. प्रतिनिधी, नगर तालुक्यात संघटित गुन्हे करणारी तीन सख्या भावांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी हा आदेश दिला. संजय, राहुल व विनय अदालतनाथ शुक्ला (रा. राजूर) यांना नगर जिल्ह्यातून आणि नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या लगतच्या भागातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे तिघे भाऊ अकोले तालुक्यात विशेषत: राजूरमध्ये अनेक गंभीर गुन्हे करीत होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, पोलिसांनी अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई केली, तरीही त्यांचा उपद्रव सुरूच होता. मारीमारी करणे, गर्दी जमवून दहशत निर्माण करणे, सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करणे, त्यांच्या कामात अडथळा आणणे, अवैधरित्या दारूचा व्यावसाय करणे, चोरी करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे असे गुन्हे त्यांच्यविरुद्ध दाखल आहेत. टोळीचा प्रमुख संजय अदालतनाथ शुक्ला (वय ३०) याच्याविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे नऊ गुन्हे दाखल आहेत. राहुल अदालतनाथ शुक्ला (वय २५) याच्याविरुद्धही नऊ गुन्हे आहेत. विनय अदालतनाथ शुक्ला याच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत. वाचा: या टोळीला जरब बसविण्यासाठी हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. राजूरचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी त्यासाठी मोठा पाठपुरावा केला. त्यावर सुनावणी घेऊन पोलिस अधीक्षकांनी या टोळीच्या तडीपारीचा आदेश दिला. राजूरमध्ये या तिघा भावांची मोठी दहशत होती. अवैध दारू विक्रीच्या व्यावसायातून त्यांनी आपले बस्तान बसविले आहे. लॉकडाउनच्या काळातही त्यांचा दारूचा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. यासंबंधी तक्रारी करणाऱ्यांना ते त्रास देत, खोट्या गुन्ह्यांत अडकवत असल्याच्याही तक्रारी होत्या. दारूबंदी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही अनेकदा या टोळीवर कारवाईची मागणी केली होती. पोलिस अधीक्षकांनी केलेल्या या कारवाईचे आता त्यांनी स्वागत केले आहे. उपद्रवी टोळ्यांना तडीपार करण्याचा अधिकार पोलिस अधक्षीकांना असतो. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातून आणखी काही टोळ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव असून त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.