शेअर बाजारात उलथापालथ ; आठवड्याचा शेवट गोड होणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 26, 2020

शेअर बाजारात उलथापालथ ; आठवड्याचा शेवट गोड होणार?

https://ift.tt/2NyYp3e
मुंबई : जगभर करोनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. करोना व्हायरसने अमेरिकेत उच्छाद मांडला आहे. त्यातच बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्यांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला. या घडामोडी आज आशियातील भांडवली बाजारांवर परिणाम करतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. भारतीय बाजारांत गुरुवारी विक्रीचा दबाव होता. गुंतवणूकदारांनी सकाळीच विक्रीचा मार्ग अवलंबला होता. त्यामुळे ३०० अंकांनी कोसळला. निफ्टीत देखील मोठी घसरण झाली. मात्र सरतेशेवटी निफ्टी १०३०० अंकांच्या नजीक आहे. ही पातळी निफ्टीसाठी निर्णायकी आहे, असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी सांगितले. ते म्हणाले की , बाजारात अनिश्चितता वाढल्याने गुंतवणूकदारांनी सावध गुंतवणूक करावी. निफ्टी १०२०५ ते १०३६२ अंकांच्या दरम्यान राहील, असा अंदाज एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी यांनी व्यक्त केला. गुरुवारी सेन्सेक्स २६.८८ अंकांच्या घसरणीसह ३४८४२ अंकांवर बंद झाला होता. निफ्टी १६ अंकांच्या घसरणीसह १०२८८ अंकांवर बंद झाला. देशभरात आज गुरुवारी कोविड-१९चे एका दिवसात १६ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले. या नंतर एकूण संसर्ग झालेल्या रुग्णाची संख्या ४ लाख ७३ हजारांपर्यंत पोहोचली आहे. करोनाच्या संसर्गामुळे आणखी ४१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नंतर देशभरातील एकूण मृत्यूपावलेल्या रुग्णांची संख्या पोहोचली आहे १४,८९४ वर. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गेल्या सहा दिवसांपासून सतत दररोज करोनाचे नवे १४ हजारांहून अधिक रुग्ण वाढत आहेत. देशात २० जूननंतर ९२,५७३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, १ जून पासून ते आतापर्यंत २ लाख ८२ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, एका दिवसात सर्वाधिक १६,९२२ नवे रुग्ण आढळल्यानंतर देशभरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४ लाख ७३ हजार १०५ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत झालेल्या एकूण ४१८ रुग्णांच्या मृत्यूसह आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १४,८९४ वर पोहोचली आहे. दरम्यान चांगली कामगिरी करणाऱ्या जगभरातील अन्य भांडवल बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजारांनी उजवी कामगिरी केली आहे. आकड्यांनुसार राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (निफ्टी) गेल्या तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना ३५.२ टक्के फायदा दिला आहे. जगभरातील अन्य शेअर बाजारांच्या तुलनेत ही कामगिरी अव्वल ठरली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये देशातील शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य ५३० अब्ज डॉलरने वाढून १.८ लाख कोटी डॉलरवर पोहोचले आहे. या कालावधीत अमेरिकी शेअर बाजारांनी २८ टक्क्यांचा परतावा दिला. याच कालावधीत जपानच्या शेअर बाजाराने २५ टक्के परतावा दिला आहे. जर्मनी आणि फ्रान्सच्या शेअर बाजारांनी अनुक्रमे २९ टक्के आणि १८ टक्के परतावा दिला आहे.