असं वाटतं भारताला फक्त सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे: शिवसेना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 1, 2020

असं वाटतं भारताला फक्त सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे: शिवसेना

https://ift.tt/36LdW9d
मुंबई: 'आपल्या महान देशाला फक्त सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे. त्याआधी हा देश नव्हता. स्वातंत्र्य लढा नव्हता. त्यातील संघर्ष आणि बलिदाने हा फक्त आभास होता. देशातील सामाजिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, औद्योगिक क्रांती वगैरे सगळे झूट आहे. साठ वर्षांत काहीच घडले नाही असं एकंदरीत दिसतं,' अशी बोचरी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. (Shiv Sena on Six Years of Modi Sarkar) पंतप्रधान मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या निमित्तानं भाजपच्या नेत्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांवर व सोशल माध्यमांवर सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. पंतप्रधान मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मोदींनी ऐतिहासिक चुका दुरुस्त केल्या, करोनाच्या संकटकाळात मोदी पंतप्रधान आहेत हे भाग्य आहे,' अशी स्तुतीसुमनं भाजपच्या प्रमुख नेत्यांनी उधळली आहेत. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारच्या एकूण कामकाजावर भाष्य करतानाच भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ' हे आजचे सक्षम नेते आहेत, पण साठ वर्षांत चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षांतही झाल्या. मोदी सरकार साधारण सहा वर्ष सत्तेवर आहे. पूर्ण बहुमत असल्याने त्यांचे सरकार पांगुळगाड्याच्या आधारे चाललेले नाही, पण देशाचा अनेक बाबतीत पांगुळगाडा झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉकडाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? नोटबंदी आणि लॉकडाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?,' असा खडा सवाल शिवसेनेनं भाजपला केला आहे. 'महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत, हिमालय, कांचनजुंगा, गंगा-यमुना, कृष्णा-गोदावरी हे सर्व सहा वर्षांतच निर्माण झाले. महात्मा गांधी, , सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे त्यांच्या हातून जे कार्य घडले ते सर्व बोलबच्चनगिरीचे नमुने आहेत, असं मानायचं का,' असाही प्रश्न शिवसेनेनं केला आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: >> आज आला, त्याआधी प्लेगसारखी महामारी येऊन गेली. याआधी देशातून पोलिओसारखे आजार हद्दपार केले गेले. टीबी, मलेरिया नियंत्रणात आणला हे कोणत्या सरकारने केले? >> ज्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या प्रे. ट्रम्प यांनी भारताकडे मागितल्या त्या गोळ्यांचे उत्पादन इंदिरा गांधी यांच्याच काळात सुरू झाले व त्याच आत्मनिर्भरतेतून देशात वैद्यकीय क्रांतीची बीजे रोवली हे कसे विसरता येईल? >> मोदींनी काश्मिरातून ३७० कलम हटवले. तीन तलाक पद्धत बंद केली. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्माण कार्य सुरू करण्यासंदर्भात निकाल दिला. हे सर्व मागच्या सहा वर्षात झाले. त्याचे श्रेय मोदी सरकारला द्यावेच लागेल, पण १९७१ साली इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून ‘फाळणी’चा सूड घेतला ही ऐतिहासिक चूक मानायची की, ऐतिहासिक कार्य? >> राजीव गांधी यांनी डिजिटल क्रांतीची सुरुवात केली. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी कोसळलेल्या अर्थव्यवस्थेस गती दिली. म्हणूनच आजचा भारत उभा आहे. ही चूक असेल तर ती कोणत्या मार्गाने तुम्ही दुरुस्त करणार आहात? >> मागच्या ७० वर्षांत अटल बिहारी वाजपेयी यांची साडेपाच वर्ष, विश्वनाथ प्रताप सिंग व चंद्रशेखर यांची मिळून दोनेक वर्ष व जनता पक्षाची सव्वा दोन वर्ष आहेत. हा कालखंड वाया गेला व फक्त मागील सहा वर्षांत देश उभा राहिला असे कोणी म्हणत असेल तर ती इतिहासाशी बेईमानी ठरेल. >> वीर सावरकर यांचा अपमान करण्याची घोडचूक मागच्या साठ वर्षांत नक्कीच झाली, पण ही घोडचूक दुरुस्त करण्यासाठी सावरकरांना भारतरत्न देण्याचा मार्ग गेल्या सहा वर्षांत स्वीकारला गेला नाही. >> सहा वर्षात जे घडवले गेले ते जगासमोर आहे. नोटबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांनी अर्थव्यवस्थेचे पानिपत झाले. गरिबी वाढली. रोजगार संपला. प्रत्येक चार माणसामागे आज एकजण बेकार आहे. सार्वजनिक कंपन्या मोडीत काढून आणि विकून आर्थिक सुधारणांचा डांगोरा पिटला जात आहे. एअर इंडियासारख्या राष्ट्रीय कंपन्या कधीही जमिनीवर कोसळतील. हे आत्मनिर्भरतेचे लक्षण नाही.