बीजिंग: करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शास्त्रज्ञांच्या या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे चित्र आहे. चीनमध्ये ही करोना प्रतिबंधक लसीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत चीनमध्ये लसीबाबत मोठी घोषणा होणार असल्याची माहिती एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने दिली आहे. करोनाला अटकाव करणारी लस सप्टेंबरपर्यंत बाधितांसाठी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. चीनच्या करोनाविरोधी उपाययोजनांचे प्रमुख असणारे डॉ. झोंग नानशान यांनी सांगितले की, आम्ही सध्या अनेक लसींवर काम करत आहोत. यातील काही लसी सप्टेंबरपर्यंत रुग्णालयात उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. करोनाची लस सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी चीनच्या सेंटर फॉर डिजीस प्रिव्हेंशन अॅण्ड कंट्रोलचे महासंचालक डॉ. गाओ फू यांनीही अशीच घोषणा केली होती. वाचा: डॉ. झोंग नानशान यांनी करोनाबाधितांच्या उपचारासाठी हर्ड इम्युनिटीवर चिंता व्यक्त केली. ब्रिटन सरकारकडून हर्ड इम्युनिटीबाबत विचार सुरू आहे. मात्र, यामुळे लाखो नागरिकांच्या प्राणाला धोका संभावत असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. हर्ड इम्युनिटीसाठी एका देशाला आपल्या लोकसंख्येपैकी ६० ते ७० टक्के जणांना संसर्गबाधित करावे लागेल. त्यातील जवळपास सात टक्के व त्याहून अधिकजणांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरील जीवितहानी कोणताही देश सहन करू शकत नाही. वाचा: वाचा: दरम्यान, करोनाच्या संसर्गाला मात देण्यासाठी अटकाव करण्यासाठी विविध देशांतील १०० हून अधिक कंपन्या प्रयत्न करत आहेत. यातील काही करोना प्रतिबंधक लस महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. काही कंपन्यांनी आपली लस प्रभावी ठरत असल्याचा दावा केला असून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीकडे त्यांनी वाटचाल केली आहे. अमेरिकेने पाच कंपन्यांच्या लसींवर विश्वास दाखवला असून त्याबाबतची महत्त्वाची घोषणा लवकर होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन प्रशासनाने लसीसाठी पाच कंपन्यांची निवड केली आहे. यामध्ये मॉडर्ना इंक, एस्ट्राजेनेका पीएलसी, फाइजर इंक, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि मर्क एंड को इंक यांचा समावेश आहे. आणखी वाचा: