संध्याकाळी पेट्रोल-डिझेल घ्या, सकाळी विका; आत्मनिर्भर व्हा: आव्हाड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 28, 2020

संध्याकाळी पेट्रोल-डिझेल घ्या, सकाळी विका; आत्मनिर्भर व्हा: आव्हाड

https://ift.tt/2ZduvHm
मुंबई: इंधन दरवाढीवरून राजकारणी आणि सेलिब्रिटींना सवाल केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिमार्ण मंत्री यांनी केंद्र सरकारच्या मोहिमेची खिल्ली उडवली आहे. संध्याकाळी पेट्रोल-डिझेल विकत घ्या आणि सकाळी विका. आत्मनिर्भर व्हा, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आत्मनिर्भर मोहिमेची खिल्ली उडवली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. घर बसल्या पैसे कमवा. संध्याकाळनंतर पेट्रोल-डिझेल विकत घ्या आणि सकाळी विका. आत्मनिर्भर व्हा, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांनी या ट्विटमध्ये पेट्रोल पंपावरील एक फोटोही पोस्ट केला आहे. या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असून त्यावर अक्कड बक्कड बंबे बो, ८०, ९० पूरे १०० असं लिहिलेलं आहे. या फोटोवर आव्हाड यांनी या खोचक ओळी लिहिल्या आहेत. या आधी आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमार, महानायक अमिताभ बच्चन आणि नेत्या स्मृती ईराणी यांचे इंधन दरवाढीचे जुने ट्विट रट्विट करून त्यांना आता वाढलेल्या इंधन दरवाढीवरून खोचक सवाल केले आहेत. तुम्ही पेट्रोल पंपावर कारमध्ये इंधन भरत नाहीत का? तुमच्या हातात येणारं इंधनाचं बिलही तुम्ही पाहत नाही का? आता तुम्ही बोललंच पाहिजे. हीच ती वेळ आहे. ती निश्चितच पक्षपाती नसाल, असा चिमटाही आव्हाड यांनी बच्चन यांना काढला होता. डिझेल आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. अब मुंबईकर क्या करे कार जलाये या कार चलाये? असा अमिताभ यांच्याच स्टाइलमध्ये खोचक सवालही त्यांनी केला होता. आव्हाड यांनी अक्षय कुमार यांनाही इंधन दरवाढीवरून खोचक प्रश्न विचारले होते. 'अक्षय, तू ट्विटरवर सक्रिय नाहीस का?... तू कार वापरणं बंद केलंस का?... तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का?... तुझ्या माहितीसाठी सांगतो की देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत,' असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. अक्षय कुमारनं सध्याच्या महागाईवरही व्यक्त व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी या माध्यमातून व्यक्त केली होती. त्यामुळे आव्हाड आता काँग्रेसच्या काळात इंधन दरवाढीवरून घेरणाऱ्या सेलिब्रिटींना रोज डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. त्यावेळी अभिनेते अनुपम खेरसह अनेकांनी ट्विट करून इंधन दरवाढीविरोधात संताप व्यक्त केला होता.