
मुंबई: 'आपल्या देशातील अनेक राजकीय पक्ष व पुढारी हे परराष्ट्रांचे लाभार्थी आहेत. फक्त काँग्रेसच नाही. भाजपने यावर बोलणे म्हणजे चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखे आहे. हमाम मे सब नंगेच आहेत. भाजपला काँग्रेस पक्षाशी नंतर कधीही लढता येईल. पण आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला,' असा टोला शिवसेनेनं मोदी सरकारला हाणला आहे. वाचा: लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यापासून काँग्रेसनं मोदी सरकारला घेरलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी रोजच्या रोज नवे प्रश्न उपस्थित करून सरकारला कात्रीत पकडत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं काँग्रेसला मिळणाऱ्या चिनी पैशांचा मुद्दा उपस्थित केला आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला दिल्लीतील चिनी वकिलातीकडून घसघशीत देणगी मिळाली, असा आरोप भाजपनं केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखात यावर भाष्य करण्यात आलं आहे. 'सध्या चीनबरोबर लढण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. गलवान खोऱ्यात चीनकडून नव्याने बांधकाम सुरू झाले आहे. अरुणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडक मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे,' असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला आहे. 'हे संकट भाजप किंवा काँगेसवर नाही; तर देशावरील संकट आहे. संपूर्ण देशाचीच प्रतिष्ठा आणि प्रतिमा पणास लागली आहे. चीन दगाबाज आहे व त्याच्या कुरापती सदैव सुरूच राहतील. पण या कुरापती थांबविण्यासाठी आमची योजना काय आहे, असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे. 'राजीव गांधी फाऊंडेशनला दिल्लीतील चिनी वकिलातीकडून घसघशीत देणगी मिळाली असा फुगा भाजपने फोडला आहे. भाजपने त्या देणगीची माहिती प्रसिद्ध केल्याने सीमेवरील चीनच्या हालचालीवर निर्बंध येणार आहेत काय? राजीव गांधी फाऊंडेशनला दिलेल्या देणग्यांचा संबंध चिनी घुसखोरी किंवा आमचे जे २० जवान शहीद झाले त्या घटनांशी असेल तर भाजपने तसे स्पष्ट करावे,' असं आव्हानही शिवसेनेनं दिलं आहे. वाचा: ही आहे सरकारची युद्धनीती 'भारताचे संरक्षणमंत्री रशियाचा दौरा करून आले व तेथून ते शस्त्र, दारूगोळा (ब्रह्मास्त्र) मागवणार आहेत. भाजपचे दिल्लीतील नेते चीनवर शाब्दिक हल्ले करत आहेत. त्यामुळं सीमेवर हालचाली करणारी लाल माकडे घाबरून पळून जातील असे त्यांना वाटते. सरकारी कृपावंत मीडिया व सोशल माध्यमांवरील रिकाम्या फौजा ‘‘भारतीय कूटनीतीपुढे चीनची माघार किंवा शरणागती’’ अशा बातम्यांचे हवाबाण हरडे सोडून लोकांना भ्रमित करीत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्यावरच चीनचे हस्तक किंवा दलाल असल्याचे ठपके ठेवले जात आहेत,' ही मोदी सरकारची चीन विरुद्धची युद्धनीती असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे.