
सातारा: सध्या जगभर करोनाचं संकट आहे. त्यामुळे ही लढाईची वेळ नाही, असं सागतानाच सध्या सगळाच येड्यांचा बाजार सुरू आहे, अशा शब्दांत भाजपचे खासदार यांनी भारत-चीन तणावावरून प्रतिक्रिया व्यक्त केली. उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी भारत-चीन तणावावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सगळा येड्यांचा बाजार आहे. देशात काय चाललंय? आता पूर्वीसारखं युद्ध राहिलं नाही. सगळा बटनावरचा खेळ आहे, असं सांगतानाच ही लढाईची वेळ नाही आणि काळही नाही. सगळ्यांनी एक झालं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनवरूनही केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली. लोकांची सहनशक्ती संपत चालली आहे. उपासमार वाढत आहे. उद्या लोक चोऱ्यामाऱ्या करू लागतील. जगण्यासाठी काही पर्यायच राहणार नसल्याने लोक चोऱ्या करतील. लोक रस्त्यावर येतील. त्यावेळी लोकांना आवरणं कठिण जाईल. लोकांना आवरण्या एवढे पोलीसही आपल्याकडे नाहीत. भविष्यात काय उद्भवू शकते हे मी सांगतोय. त्यामुळे तुम्ही किती दिवस लॉकडाऊन ठेवणार आहात? किती दिवस लोकांना भीतीच्या सावटाखाली ठेवणार आहात? असं सांगतानाच आता लोकशाहीतील राजांनी परिस्थिती नियंत्रणात आणावी. चांगला राज्यकारभार करावा. राजेशाही असती तर कारभार कसा करावा हे मीच दाखवून दिलं असतं, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी करोना रोखण्यासाठी आयुर्वेदिक उपचार सुरू करण्याचा सल्लाही दिला. पूर्वीच्या काळी अॅलोओपॅथिक नव्हतं. आयुर्वेदिकच औषधे होती. त्यामुळे करोनाबाबत आयुर्वेदिक उपचाराचा विचार शासनाने केला पाहिजे, असंही ते म्हणाले. त्यापेक्षा खाऊन मरा आपल्याकडे करोनाचा खूपच बाऊ केला जात आहे. हवेत कोणता ना कोणता विषाणू असतोच. आपल्याला साधी सर्दी होते, ती सुद्धा हवेतील विषाणूमुळे. मी अगदी मोठमोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. त्यामुळे माझी मतं ठाम झाली आहेत. करोनाचा उगाच बाऊ करण्यात अर्थ नाही. करोना कशातून होतो? कोणी म्हणतं चिकनमधून, कोणी म्हणतं मटणमधून तर कोणी म्हणतं भाज्यांमधून, मग खायचं काय? त्यापेक्षा खाऊन मरा, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.