
मुंबई : मागील सहा महिन्यांहून अधिक काळ जागतिक अर्थव्यवस्थेला जोखडून ठेवणाऱ्या करोना व्हायरसवर लस शोधून काढण्यास संशोधकांना यश आले आहे. करोना लसीच्या वृताने अमेरिका युरोप आणि आशियात बुधवारी तेजी दिसून आली. ही तेजी कायम राहण्याची शक्यता शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. निफ्टी मागील तीन सत्रात एका ठराविक झोनमध्ये आहे. त्याची वाटचाल पाहता तो १०५५३ अंकांपर्यंत मजल मारेल. तर १०३३८ हा त्याचा नीचांकी स्तर राहील, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी यांनी सांगितले. कोटक सिक्युरिटीजचे सहज अग्रवाल यांच्या मते निफ्टी १०४०० वर बंद झाला आहे. निफ्टीला १०२५० च्या पातळीवर सपोर्ट आहे. तो जर तोडला तर दबाव तयार होईल. गुंतवणूकदारांनी बँकिंग, वित्त आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना पसंती दिल्यामुळे भांडवल बाजार बुधवारी उसळले होते. मुंबई शेअर बाजाराचा ४९८.६५ अंकांनी वधारत ३५,४१४.४५ या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील १२७.९५ अंक वर जात १०,४३०.०५ अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँकेला सर्वाधिक ६.५८ टक्के फायदा झाला. त्याखालोखाल बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, बजाज फायनान्स, आयटीसी, इंडसइंड बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक व रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांना फायदा झाला. त्याचवेळी एनटीपीसी, नेस्ले इंडिया, महिंद्र अॅण्ड महिंद्र, एल अॅण्ड टी व ओएनजीसी या कंपन्यांच्या समभागांना तोटा सहन करावा लागला. या कंपन्यांचे समभाग २.४० टक्क्यांपर्यंत खाली आले. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पीएमआयनुसार देशातील औद्योगिक उत्पादन पुन्हा सुरू होऊन ते स्थिर होण्याकडे वाटचाल करत आहे. तसेच जीएसटीचे संकलनही एप्रिल व मे महिन्यांपेक्षा जून महिन्यात अधिक झाले आहे. याचाही सकारात्मक परिणाम भांडवल बाजारांवर दिसून आला. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत लागू करण्याची घोषणा यांनी केली आहे. पुढील ५ महिन्यांसाठी ८० कोटीहून अधिक गरीब नागरिकांना ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ मोफत दिले जातील, या बरोबर प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणे देण्यात येणार आहेत. दरम्यान, करोनाने भारतात कहर सुरु केला आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या ६ लाखांवर गेली आहे. राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत करोनाचे २४४२ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे दिल्लीतील करोना रुग्णांची एकूण संख्याही ८९ हजारांवर गेली आहे. तर महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ५५३७ नवे रुग्ण आढळले आहेत. कोव्हीड-१९ इंडिया डॉट ओआरजीनुसार आज बुधवारी रात्रीपर्यंत करोना रुग्णांची संख्या ६ लाखांवर गेली आहे. देशात करोनाचे एकूण ६, ०१, ९५२ रुग्ण आढळून आले. यापैकी ३,५७,६१२ जण करोनामुक्त झाले आहेत. यापैकी १७, ७८५ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.