मुंबई : बाजारातून नफेखोरीची संकेत मिळत आहेत. इंडेक्सवरील दबाव वाढला असून पहिल्यांदाच त्यात घसरण झाली आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी यांनी सांगितले. ते म्हणाले की निफ्टी १०६७६ स्तराच्या खाली घसरला तर तो १०५५३ पर्यंत येईल. समजा आज बाजारात तेजी परतली तर तो १०७६४ अंकांवर वाढेल, असे त्यांनी सांगितले. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विश्लेषक चंदन तपारिया यांच्या मते निफ्टी १०८०० ते १०८५० च्या दरम्यान राहील. खालच्या स्तराला तो १०५५० अंकावर घसरेल. अमेरिकेतील शेअर बाजारात बुधवारी तेजीची लाट दिसून आली. करोनाचे संकट गडद होत असले तरी अर्थव्यवस्था झपाट्याने पूर्वपदावर येत आहे असे ताज्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्यामुळे डाउजोन्स, नॅसडॅक आदी शेअर निर्देशांक वधारले. युरोपात देखील सकारात्मक वातावरण होते. गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला. गुंतवणूकदारांनी विदेशी भांडवल बाजारांतील चढउताराकडे फारसे लक्ष न देता गुंतवणूक केल्यामुळे बाजार वर गेले. विदेशी भांडवलाचा ओघ कायम राहील आणि देशात मान्सून चांगल्या प्रकारे सक्रिय राहील, या आशेवर भांडवल बाजार गेले काही दिवस तेजीत होते. जागतिक कमाॅडिटी बाजारात आज कच्च्या तेलाच्या किंमतीत १३ सेंट्सची घट झाली. तेलाचा भाव प्रती बॅरल ४२.९५ डाॅलरपर्यंत खाली आला. मागील पाच सत्रात तेजीने वधारलेल्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्याने बुधवारी आणि निफ्टीच्या घोडदौडीला ब्रेक लागला. बुधवारी दिवसअखेर सेन्सेक्स ३४५ अंकांनी घसरून ३६३२९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९३ अंकांनी घसरून १०७०५ अंकावर स्थिरावला होता. देशभरात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात एकूण २४ हजार २४८ नवे रुग्ण वाढले आहेत. तर २४ तासांमध्ये बळी गेलेल्यांची संख्या आहे ४२५. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ९७ हजार ४१३ वर पोहोचली असून आता पर्यंत देशात एकूण १९ हजार ६९३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रोजगार निर्मितीबाबत एक सुखद चित्र निर्माण झाले आहे. जॉबस्पीक इंडेक्स जूनमध्ये १ हजार २०८ इतकावर गेला. तो मे महिन्यात ९१० होता. मे महिन्याच्या तुलनेत ३३ टक्के वाढ झाली आहे. अर्थात गेल्या वर्षाच्या जून महिन्याशी तुलना करता यात ४४ टक्के इतकी घट आहे. नोकरी जॉबस्पीक एका महिन्याचा इंडेक्स आहे जो नोकरी डॉट कॉम मधील जॉब लिस्टिंगच्या आधारे तयार केला जातो.मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये नोकर भरतीची मध्ये ३३ टक्के इतकी वाढ झाली आहे.