मुंबई : इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८७.१९ रुपयांवर कायम आहे. तर डिझेलचा प्रती लीटर भाव ७९.०५ रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८०.७८ रुपये प्रती लिटर झाला आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये आहे. चेन्नईत ७७.९१ रुपये आणि कोलकात्यात ७५.८९ रुपयांपर्यंत स्थिर आहे. देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यात झालेलं नसून भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मागील महिनाभर पेट्रोल आणि डिझेल दर वाढवले. गेल्या महिन्याभरात २१ वेळा पेट्रोल आणि २३ वेळा डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. जागतिक कमाॅडिटी बाजारात बुधवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत १३ सेंट्सची घट झाली. तेलाचा भाव प्रती बॅरल ४२.९५ डाॅलरपर्यंत खाली आला. क्रूडच्या किंमतीच्या तुलनेत देशातील पेट्रोल आणि डिझेल महागच आहे. त्यात केंद्र आणि राज्य सरकारचा कर लादलेला आहे. कंपन्यांना आता इंधन दरात कपात करावी अशी मागणी केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर गेल्या महिन्याच्या अखेरीस देशभरात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कंपन्यांनी आठवडाभर इंधन दर स्थिर ठेवले होते. दरम्यान, जागतिक बाजारात देखील क्रूड ऑइलचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये यापूर्वी केलेल्या दरवाढीने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. माल वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात डिझेलचा वापर करते. डिझेल दरवाढीने यापूर्वीच माल वाहतूकदारांचे कंबरडे मोडले असून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दरवाढीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, इंधन दरवाढीने महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.