गडचिरोली: गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक झाला आहे. कोठी या गावात नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. याआधी भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून हल्ले सुरूच आहेत. कोठी गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. दुशंत नंदेश्वर असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. तर दिनेश भोसले हे जखमी झाले आहेत. कोठी या गावात ते दुकानात खरेदीसाठी गेले होते. दोघेही जवान साध्या वेशात होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात नंदेश्वर हे शहीद झाले. तर भोसले हे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. शहीद सप्ताहादरम्यान पोलिसांच्या बंदोबस्तामुळे नक्षलवाद्यांना कुठलीही घटना घडवून आणता आली नाही. यानंतर पोलिसांनी दोन जहाल नक्षल्यांना अटक केली होती. तर दोघांनी आत्मसमर्पण केले होते. या घटनांमुळे बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. ३ महिन्यांपूर्वी भामरागडमध्ये केला होता हल्ला तीन महिन्यांपूर्वीही गडचिरोलीतील भामरागडमध्ये नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यात दोन जवान शहीद झाले होते.पोयरकोटी-कोपर्शी येथील जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली. जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला होता. त्यात दोन जवान शहीद झाले होते.