
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धतील अंतिम सामना रविवारी 8 मार्च रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारताचा हा पहिलावहिला आणि एकूण तिसरा टी 20I वर्ल्ड कप ठरला. त्यानंतर 11 मार्च रोजी आयपीएलच्या 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार 28 मार्चपासून या 19 व्या स्पर्धेची रंगत रंगणार आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा पहिला सामना केव्हा?
लखनौ सुपर जायंट्सला आतापर्यंत एकदाही आयपीएल चॅम्पियन होता आलेलं नाही. त्यामुळे यंदा लखनौ टीमची ही प्रतिक्षा संपवण्याचा प्रयत्न असणार आहे. विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्या नेतृत्वात लखनौ टीम 19 व्या मोसमात खेळणार आहे. लखनौ या मोहिमेतील आपला पहिला सामना हा बुधवारी 1 एप्रिलला खेळणार आहे. लखनौसमोर पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
टीममध्ये कोण कोण?
आयपीएल 19 व्या मोसमाआधी मिनी ऑक्शन झालं. या मिनी ऑक्शनमधून अनेक संघांनी आपल्या गरजेनुसार खेळाडूंना आपल्या गोटात घेतलं. तर काही खेळाडूंना कायम ठेवलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा तगडा अनुभव असलेली एडन मार्करम आणि मिचेल मार्श ही जोडी लखनौसाठी ओपनिंग करणार आहे. टॉप आणि मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगची जबाबदारी निकोलस पूरन आणि आयुष बडोनी यांच्यावर असेल. अब्दुल समद फिनीशरच्या भूमिकेत दिसू शकतो. तर मोहम्मद शमी, मयंक यादव आणि आवेश खान या त्रिकुटावर वेगवान गोलंदाजीची धुरा असू शकते.
लखनौच्या पहिल्या 4 सामन्यांचं वेळापत्रक
पहिला सामना, 1 एप्रिल, विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स, लखनौ.
दुसरा सामना, 5 एप्रिल, विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, हैदराबाद.
तिसरा सामना, 9 एप्रिल, विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, इडन गार्डन्स.
चौथा सामना, 12 एप्रिल, विरुद्ध गुजरात टायटन्स, लखनौ.
लखनौ सुपर जायंट्स टीमची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटीकपर), मिचेल मार्श, एडन मार्करम, निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, वानिंदु हसारंगा, दिग्वेश राठी, मोहम्मद शमी, मयंक यादव आणि आवेश खान.
इम्पॅक्ट प्लेयर : शाहबाज अहमद, एनरिक नॉर्खिया आणि जोश इंगलिस.