खूशखबर! भारतीय लसीने ओलांडला आणखी एक महत्त्वाचा टप्पा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 14, 2020

खूशखबर! भारतीय लसीने ओलांडला आणखी एक महत्त्वाचा टप्पा

https://ift.tt/3gXmpu2
नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआर आणि भारत बायोटेककडून विकसित केली जात असलेल्या करोनावरील लसीचे प्राथमिक परिणाम सकारात्मक आल्याची माहिती आहे. देशातील १२ ठिकाणी ३७५ स्वयंसेवकांवर कोवॅक्सिनची ही चाचणी केली जात आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला दोन डोस दिले जात आहेत. लस सुरक्षित आहे. आम्हाला कोणताही चुकीचा परिणाम आढळून आला नाही, अशी माहिती रोहतक पीजीआयमधील प्रमुख निरीक्षक सविता वर्मा यांनी दिली. स्वयंसेवकांना आता लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. यासाठी निरीक्षक आता रक्ताचे नमुने जमा करत आहेत. ज्याच्या आधारावर या लसीची रोगप्रतिकारकशक्ती किती आहे त्याचा आढावा घेतला जाईल. 'सध्या तरी ही लस अत्यंत सुरक्षित आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये हे औषध किती गुणकारी आहे याचा शोध घेण्यासाठी नमुने जमा केले आहेत', अशी माहितीही सविता वर्मा यांनी दिली. पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत संपणं अपेक्षित आहे. निरोगी स्वयंसेवकांना दुसरा डोस देण्याची सध्या तयारी सुरू आहे. आतापर्यंत रुग्णांमध्ये कोणताही चुकीचा परिणाम आम्हाला आढळून आलेला नाही, असं वर्मा यांनी सांगितलं. दरम्यान, ही लस सुरक्षित असल्याचं दिल्लीच्या एम्समधील प्रमुख निरीक्षक संजय राय यांनीही सांगितलं. एम्सने १६ स्वयंसेवकांना भरती करुन घेतलं असून त्यांच्यावर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची चाचणी सुरू आहे. सध्या सुरक्षित आणि प्रभावी लसीची स्पर्धा सुरू झाली आहे. सर्व प्रकारच्या घडामोडींवर सरकारचंही लक्ष आहे. ही भारताची पहिली लस आहे, जी भारत बायटेकने आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आयसीएमआरने पुण्याच्या संस्थेत विलग केलेले करोना विषाणू घेऊन ही लस निर्मिती केली जात आहे. सर्व १२ ठिकाणांहून चाचणीचे परिणाम सकारात्मक आल्यास भारत बायोटेककडून दुसऱ्या टप्प्यासाठी भारतीय औषध नियामक संचालनालयाकडे परवानगीसाठी अर्ज केला जाईल. सर्व काही सुरळीत घडल्यास पुढच्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात भारतीय लस उपलब्ध होईल, अशी माहिती एका निरीक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.