म. टा. प्रतिनिधी, नगर: येथे संत ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर राहत असलेले माजी प्राचार्य रघुनाथ आगळे यांच्या घरी पडला आहे. चोरट्यांनी मुख्य दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करीत तब्बल सात तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना काल (ता. २२) पहाटे घडली. यासंदर्भात कौशल्या रघुनाथ आगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेवासा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्यांनी घरातील एका महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी धारदार शस्त्राने कापण्याचा प्रयत्न केला. यामध्ये संबंधित महिलेला हाताला जखम झाली आहे. आगळे यांच्या घरात शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात पाच आरोपींनी कडीकोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कौशल्या आगळे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने काढून घेतले. तसेच कौशल्या आगळे यांच्या हातातील बांगडी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बांगडी निघाली नाही. त्यामुळे त्यांनी धारदार शस्त्राने बांगडी कापण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आगळे यांच्या हाताला जखम झाली. त्यांनी आरडाओरड केली तेव्हा चोरट्यांनी काही सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर करीत आहेत.