
अहमदनगर: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ, असे सांगण्यासाठी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे रात्री साडेबारा वाजता शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांना भेटले होते. खुद्द कोरगावकर यांनीच हा गौप्यस्फोट आज शिवसैनिकांसमोर केला. मात्र मी त्यांना वरिष्ठांचा निर्णय पाळणार असल्याचे सांगत 'जय महाराष्ट्र' केला, असेही ते म्हणाले. यानिमित्ताने मात्र नगर महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवीन खेळी करण्याचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वाचा: सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नगर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाची निवड झाली. या निवडणुकीत सभापतीपदी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मनोज कोतकर यांना संधी मिळाली. तर मनोज कोतकर यांच्या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांनी हा अर्ज मागे घेतला. या निवडणुकीनंतर नगरच्या शिवसेनेतील वाद उफाळून आला होता. त्यातच आज नगरच्या शिवसेनेत असणाऱ्या गटातटांचे मनोमिलन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत भाऊ कोरेगावकर यांनी शिवसैनिकांसमोर स्थायी समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडी सांगत एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, 'स्थायी समिती सभापती निवडीच्या आदल्या रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान महापौर बाबासाहेब वाकळे मला भेटले होते, त्यांनी मला विचारले तुमचा फॉर्म ठेवणार का नाही ? त्यावर मी म्हणालो, ते वरती ठरेल. त्यावर ते म्हणाले, 'तुम्ही फॉर्म ठेवा, आम्ही मतदान करू. पण मी त्यांना स्पष्ट सांगितले, जे आमच्या पक्षात वरून ठरते ते आम्ही करतो 'जय महाराष्ट्र'. दरम्यान, याबाबत या बैठकीनंतर भाऊ कोरेगावकर यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, 'भाजपचे नगरसेवक मतदान करायला तयार म्हणजे, कदाचित ते लबाडाच्या घरचे आमंत्रण असावे. आमचे उमेदवार योगीराज गाडे यांना भाजपचे नगरसेवक भेटले होते, त्यांनी सांगितले होते तुम्हाला सपोर्ट करू. पण मी योगीराज गाडे यांना आमचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना संपर्क करण्यास सांगितला होता, आणि नार्वेकर यांनी त्यांना जे काही सांगितले ते त्यांनी ऐकले आहे. आता स्थायी समिती सभापती हे महाविकास आघाडीचे आहेत,' असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढचा महापौर शिवसेनेचा 'नगर महापालिकेत पुढचा महापौर शिवसेनेचाच होईल. मी एवढेच सांगतो, जो उमेदवार दिला जाईल, तो महापौर होईल. मग त्यासाठी माझी दुश्मनी कोणाशीही होऊ द्या,' असे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी शिवसैनिकांसमोर ठणकावून सांगितले. फक्त एवढच की माझी दुश्मनी ही शिवसैनिकांची सोबत होऊ नये, असं वाटतं,' असेही ते म्हणाले. वाचा: वाचा: