
वॉशिंग्टन: अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू असताना निवडणूक प्रचार जोमात सुरू होता. मंगळवारी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी करोनाच्या मुद्यावर आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा पार पडल्या. या प्रचारसभेत हजर असलेल्या ३० हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली असून ७०० जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात करोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत झाला आहे. करोनाबाधितांची संख्या ९० लाखांहून अधिक झाली आहे. करोनाच्या संसर्गाचा मुद्दा निवडणूक प्रचारात अग्रभागी होता. स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी ट्रम्प यांच्या प्रचार सभांचा अभ्यास केला. या सभेत हजर राहण्याची किंमत अनेकांना चुकवावी लागली असून करोनाची बाधा व त्यामुळे काहींचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांच्या ज्या ठिकाणी प्रचारसभा झाल्या त्या ठिकाणी करोनाबाधितांची संख्या वाढली असल्याचे समोर आले. स्टनफर्ड विद्यापीठाने २० जून ते २२ सप्टेंबर या दरम्यान झालेल्या १८ प्रचारसभांचा अभ्यास केला आहे. वाचा: स्टनफर्ड विद्यापीठाचे हे संशोधन समोर आल्यानंतर डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडले. ट्रम्प यांना अमेरिकन नागरीक आणि त्यांच्या समर्थकांची काळजी नसल्याचे बायडन यांनी ट्विटमध्ये म्हटले. महासाथीच्या काळात ट्रम्प यांच्या प्रचारसभेत गोंधळाची स्थिती असल्याचे संशोधकांनी म्हटले. करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असतानाही ट्रम्प यांनी हजारोंच्या उपस्थितीत प्रचारसभा घेतली. त्यामध्ये सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडाला होता. त्याशिवाय अनेकांनी मास्कचा वापरही केला नसल्याचे समोर आले. करोनाची बाधा होण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी फार कमी वेळा मास्कचा वापर केला होता. ट्रम्प यांनी अनेकदा मास्क न वापरण्याबाबतही भाष्य केले होते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन ट्रम्प यांच्या प्रचारसभेत झाले. त्यामुळेच आता ट्रम्प यांच्या सभांना करोना सुपरस्प्रेडर म्हटले जात आहे. वाचा: दरम्यान, काही आठवड्यांआधी प्रसिद्ध विज्ञानविषयक नियतकालिक 'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'ने ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली होती. आपल्या २०८ वर्षाच्या कालावधीत या नियतकालिकेने पहिल्यांदा राजकीय संपादकीय लिहीले होते. संपादकीय मंडळातील ३४ जणांनी या संपादकीयावर स्वाक्षरी केली होती. त्यातील ३३ जण हे अमेरिकन आहेत. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती ट्रम्प यांना हाताळता आली नाही. त्यांनी या संकटाला अधिकच गडद केले असल्याचे संपादकीयात म्हटले. वाचा: डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर निशाणा साधताना म्हटले की, राजकीय नेतृत्वाने अमेरिकन नागरिकांना निराश केले आहे. अमेरिकेत सुरुवातीला खूपच कमी प्रमाणात चाचणी करण्यात आली. त्याशिवाय रुग्णालयात सुरक्षात्मक उपकरणांचीही कमतरता होती. मास्क घालणे, सोशल डिस्टेंसिंग, क्वारंटाइन आणि आयसोलेशनच्या मुद्यावरही राजकीय नेतृत्व कमी पडले असल्याची टीका करण्यात आली. ट्रम्प यांनी करोनाची परिस्थिती हाताळताना शास्त्रज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप याआधीच करण्यात येत आहे.