
'अहमद पटेल यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य कॉंग्रेस पक्षासाठी वाहून घेतलं होतं. पटेल हे माझे विश्वासू, कर्तव्यनिष्ठ आणि मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे सहकारी होते. अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. ही पोकळी भरून काढणे शक्य नाही', अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शोकसंदेशातून व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी शोक संदेश जारी केला आहे. या संदेशातून त्यांनी अहमद पटेल यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पटेल यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सामिल असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या. अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे दीर्घकाळ राजकीय सल्लागार होते. ‘अहमदभाई’ या नावाने ते कॉंग्रेसच्या वर्तुळात ओळखले जात असत. सोनिया गांधींचे सल्लागार या नात्याने कॉंग्रेस पक्षात पटेल यांचा प्रचंड दबदबा होता. केंद्रात २००४ ते २०१४ दरम्यान कॉंग्रेसप्रणित यूपीए आघाडी सत्तेत असताना अहमद पटेल हे अत्यंत मोलाची भूमिका बजावत होते. कॉंग्रेस पक्षाबाबतचे धोरण असो की केंद्र तसेच राज्यांचे सरकारी धोरण, प्रत्येक बाबीवर निर्णय घेताना सोनिया गांधी या अहमद पटेल यांचा सल्ला घेत असत. कॉंग्रेस पक्षात पदाधिकाऱ्यांची निवड, नेमणुका असो की धोरण तयार करण्याचे काम असो, प्रत्येक महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अहमद पटेलांचं मत विचारात घेत जात असे. त्यामुळे देशभरातील कॉंग्रेस पक्षातील खासदार, आमदार, मातब्बर प्रादेशिक नेते, राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत अहमद पटेल यांना जाऊन पहिले भेटत असत. देश-विदेशातील अनेक राजकीय नेत्यांशी अहमद पटेल यांचे उत्तम संबंध होते. अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सध्या अडचणीतून जात असलेल्या कॉंग्रेस पक्षाला अहमद पटेल सारख्या मुत्सद्दी नेत्याची अत्यंत गरज होती. अशा काळातच पटेल यांचं जाणं अनेकांना जिव्हारी लागलेलं आहे. ‘अहमद पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. कॉंग्रेस त्यांचा श्वास होता. पक्षाच्या खडतर काळात ते खंबीरपणे उभे राहिले. पटेल हे पक्षासाठी अमूल्य ठेवा होते.’ अशा शब्दात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. क्लिक करा आणि वाचा- १५ नोव्हेंबर रोजी अहमद पटेल यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी राहुल गांधी यांनी ट्विट करून अहमद पटेल यांची प्रकृती लवकर बरे होण्याविषयी कामना व्यक्त केली होती. कॉंग्रेस पक्षाला पदोपदी पटेल यांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचं राहुल यांनी म्हटलं होतं. क्लिक करा आणि पाहा क्लिक करा आणि वाचा-