
करोना सुरू होण्याच्या अगोदर भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ०-३ ने पराभव स्वीकारावा लागला होता. नऊ महिन्यांपूर्वी मिळालेल्या या व्हाइटवॉशनंतर भारतीय संघात आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह आता भारतीय संघात नसेल. २०१९ च्या विश्वचषकापासूनच धोनी क्रिकेटपासून दूर होता. पण तो खेळाडू आणि चाहत्यांच्या मनात कायम राहिला. पण आता धोनीच्या निवृत्तीमुळे केएल राहुलचा वन डे आणि टी-२० मध्ये प्रथम क्रमांकाचा यष्टीरक्षक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयपीएलमधील अत्यंत खराब कामगिरीमुळे भारतीय संघाचा पर्यायी यष्टीरक्षक रिषभ पंत संघात जागा मिळवण्यात अपयशी ठरला. तर दुसरीकडे केएल राहुलने आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवत दमदार कामगिरी केली. त्यामुळे केएल राहुलकडे संघ व्यवस्थापन आणि निवड समिती धोनीचा पर्याय म्हणून पाहत आहे. राहुलकडून मोठी अपेक्षा माजी यष्टीरक्षक फलंदाज दीप दासगुप्ता टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, 'एकही चूक व्हायला नको. महत्त्वाचा फलंदाज आणि प्रथम क्रमांकाचा यष्टीरक्षक ही अत्यंत मोठी जबाबदारी आहे. राहुल हा दीर्घकाळासाठीचा पर्याय आहे की नाही हे सांगू शकत नाही. पण संघ व्यवस्थापनाला राहुलकडून फलंदाजी आणि यष्टीरक्षण या दोन्ही जबाबदाऱ्यांची अपेक्षा किमान २०२३ च्या विश्वचषकापर्यंत तरी आहे.' संजू सॅमसनही ठरू शकतो पर्याय? टी-२० आणि वन डे मालिकेतील सहा सामन्यांपैकी एक-दोन सामन्यात संजू सॅमसनला संधी देणंही चांगला प्रयोग ठरू शकतो, असंही दासगुप्ता सांगतात. राहुलला सातत्याने संधी देणं गरजेचंच आहे, पण संजू सॅमसनलाही संधी मिळायला हवी, जेणेकरुन तो यासाठी कार्यक्षम आहे की नाही याचाही अंदाज संघ व्यवस्थापनाला येईल. कॉरेंटाईन नियमांचा अडथळा दुबईत आयपीएल संपवून गेल्यानंतर खेळाडूंना आता ऑस्ट्रेलियात १४ दिवसांचा कॉरेंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे हा निश्चितच एक अडथळा आहे. पण मर्यादित षटकांची मालिका संपल्यानंतर जे खेळाडू ऑस्ट्रेलियातच थांबतील आणि कसोटीत सहभाग घेतील त्यांना फायदा होईल, असं जाणकार सांगतात. चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे आणि आर अश्विन यांना रेड बॉलने जास्त काळ सराव केल्यामुळे फायदा होणं अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियाच्या परिस्थितीत जम बसवण्यासाठी त्यांना निश्चितच फायदा होईल. पण मानसिक थकवा असेलच. बीसीसीआयने खेळाडूंसाठी एक चांगली गोष्ट केली आहे, की कुटुंबालाही सोबत ठेवण्याची परवानगी दिली आहे. अन्यथा अडचणी आणखी वाढल्या असत्या, असं दासगुप्ता म्हणाले.