
म. टा. प्रतिनिधी, नगर: रुईछत्तीसी (ता. नगर) येथे एका कपड्याच्या दुकानात रात्रीच्या वेळी छपराचे पत्रे उचकटून आतमध्ये प्रवेश करीत तब्बल २ लाख ३६ हजार ७५५ रुपयांचे कपडे चोरट्यांनी पळवून नेले. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात काल, सोमवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना १२ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. मात्र, एकूण किती माल चोरीला गेला, याची खात्री करण्यास दुकानदाराला वेळ लागल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विभिशन शंकर सुरवडे यांचे रूईछत्तीसी येथे कपड्याचे दुकान आहे. सुरवडे हे नेहमीप्रमाणे १२ नोव्हेंबरला आपले दुकान रात्री ९ वाजता बंद करून गेले. दुसऱ्या दिवशी दुकान उघडले, तेव्हा त्यांना दुकानातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच दुकानाच्या छपराचे पत्रे उचकटलेले दिसले. याबाबत त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व नेमका किती माल चोरीला गेलेला आहे, याची खात्री करण्यास दुकानदाराला सांगितले. त्यानुसार दुकानदाराने खात्री केली असता जिन्स, रुमाल, साडी, टॉप, टी शर्ट, टॉवेल आदी जवळपास २ लाख ३६ हजार ७५५ रुपयांचे कपडे चोरीला गेल्याचे समोर आले. लाखो रुपयांचे कपडे चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित दुकानदाराने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात काल, सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत हे करीत आहेत.