
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शकरपूर परिसरात चकमकीदरम्यान ५ दहशतवाद्यांना पकडले आहे. हे सर्व दहशवादी इस्लामिक आणि खलिस्तानी संघटनांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी दीर्घकालीन मोहीम राबवली होती. थोड्याच वेळात पत्रकार परिषद आयोजित करून पोलिस या कारवाईबाबत माहिती देणार आहेत. दिल्लीतील शकरपूर परिसरात पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाल्यानंतर ५ दहशतवाद्यांना पकडण्यात आले. दिल्लीच्या विशेष पथकाचे पोलिस उपायुक्त प्रमोद कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ५ दहशतवाद्यांपैकी दोन पंजाबचे, तर उर्वरित ३ काश्मीरचे आहेत. या दहशतवाद्यांकडून हत्यारे आणि आक्षेपार्ह सामान हस्तगत करण्यात आले आहे. पकडले गेलेल्या दहशतवाद्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे स्पष्ट होत असल्याचे कुशवाहा म्हणाले.