
बुलंदशहर: उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीचे कारमधून केले आणि त्यानंतर तिला जंगलात नेऊन तिच्यावर चौघांनी बलात्कार केला. तिथेच तिला गंभीर अवस्थेत सोडून आरोपी फरार झाले. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. छतारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात आले. त्यांनी न्याय द्यावा अशी विनंती पोलिसांना केली. पीडित कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ डिसेंबरला संध्याकाळी मुलगी घरातून बाहेर पडली. बाजारात जात असताना, एक कारमधून चौघे जण आले. त्यांनी तिला कारमध्ये जबरदस्ती बसवले. तिला जंगलात नेले. तेथे चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. तिथेच तिला गंभीर अवस्थेत सोडून ते पसार झाले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली तर, आईवडील आणि लहान भावाला ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली असल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. पोलिसांनी पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे चौघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तिघांना अटक करून त्यांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची कसून चौकशी केली जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.