
मुंबई : पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. आज सलग सहाव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली आहे. आज पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी महागले आहे. डिझेल दरवाढीने मालवाहतूकदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे. तब्बल १५ वेळा झालेल्या दरवाढीने डिझेल ३.४१ रुपयांनी महागले आहे. २० नोव्हेंबरपूर्वी कंपन्यांनी ४८ दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर दरवाढीचा सपाटा कायम ठेवला. २० नोव्हेंबरनंतर झालेल्या १५ वेळा दरवाढीने पेट्रोल देखील २.५५ रुपयांनी महागले आहे. दरम्यान, आज सोमवारी कमॉडिटी बाजारात तेलाचा भाव १६ सेंट्सनी घसरला. तो प्रती बॅरल ४९.०९ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव १९ सेंट्सने घसरला आणि ४६.०७ डॉलर प्रती बॅरल झाला. करोना प्रतिबंधात्मक लसीची प्रगती तेलाचा भाव कमी करण्यास कारणीभूत ठरली. तेलाचा भाव ५० डॉलरच्या आसपास असून त्याचा परिणाम आयातीवर होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ सर्वच प्रमुख शहरांत पेट्रोल दरात आगडोंब उसळला आहे. नागपूर, परभणी, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद, आणि बुलढाणा येथे पेट्रोल सध्या ९० रुपयांवर आहे. परभणी शहरात पेट्रोलचा उच्चांकी ९१.९५ पैसे दर आहे.