
म. टा. प्रतिनिधी, पुणे 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कारशेडबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. पवारांबाबत मला विश्वास असून, त्यांनी याबाबतचा अहवाल वाचल्यावर ते व्यवहार्य निर्णय घेतील. ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत,' अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी रविवारी व्यक्त केली. तसेच, 'मुख्यमंत्री यांनीही पंतप्रधानांशी वस्तुस्थिती समजून घेऊन बोलावे,' असाही सल्ला त्यांनी दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कारशेडबाबत विरोधकांवर केलेल्या टीकेला उत्तर दिले. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी या प्रश्नावर पवार हे पंतप्रधानांशी बोलून मार्ग काढतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर 'पवारांबरोबर आमचे कितीही वैचारिक मतभेद असले, तरी ते याबाबतचा अहवाल वाचतील, तेव्हा व्यवहार्य निर्णय घेतील. ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, याचा मला विश्वास आहे,' असे फडणवीस म्हणाले. 'मेट्रो प्रकल्प हा कोणाच्या प्रतिष्ठेचा विषय नाही. हा राज्य सरकारच्या एकट्याचाही प्रकल्प नाही. केंद्र सरकार यामध्ये ५० टक्के भागीदार असून, 'जायका'कडून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत या प्रकल्पाबाबत काही बदलणे म्हणजे हा प्रकल्प अडचणीत आणण्यासारखे आहे. या प्रकल्पाबाबत आपण भावनिकतेने जोडले गेले असून तो होऊ नये, असे कोणाचेही मत नाही. या प्रकल्पाच्या अनेक अडचणीही आपण सोडविल्या आहेत,' असे फडणवीस म्हणाले. कांजूरमार्गला कारशेड करायचे असेल, तरीही आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल. त्याशिवाय ही कारशेड होऊ शकत नाही हे सत्य का लपवत आहात,' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 'हा श्रेयवादाचा प्रश्न नाही. या प्रकल्पाचे पूर्ण श्रेय मुख्यमंत्र्यांनीच घ्यावे आणि मेट्रो पूर्ण करून त्याचे उद्घाटनही करावे. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. मुख्यमंत्र्यांनी भविष्यात येथे अधिकची जागा लागली, तर असा प्रश्न उपस्थित केला आहे. असे काहीही होणार नसून आरे कारशेडला आतापर्यंत जेवढी जागा दिली, त्यापेक्षा एक इंचही जादा जागा भविष्यात दिली जाणार नाही, असा ठराव करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ,' असे फडणवीस म्हणाले.