
मुंबई : ' केवळ बाळगल्याच्या कारणाखाली गुन्हा दाखवला जाऊ शकत नाही. नोटा बनावट असल्याची पूर्ण जाणीव असूनही त्या चलनात आणल्याचे किंवा त्या वापरल्याचे दाखवणारे पुरावे हवेत. हे दाखवणारे पुरावे आरोपपत्रात दिसत नाहीत. त्यामुळे तरुण वय असलेल्या आरोपीला अधिक काळ गजाआड ठेवता येणार नाही,' असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील राहुल वचकळ (वय १९) या तरुणाची नुकतीच जामिनावर सुटका करताना नोंदवले. आरोपी तरुणाने खटल्यातील सुनावणीला नियमितपणे हजेरी लावावी तसेच खटल्यातील सरकारी पक्षाच्या पुराव्यांमध्ये फेरफार करू नये, अशा अटीही न्या. भारती डांगरे यांनी आपल्या आदेशात घातल्या. गेल्या वर्षी पुण्यातील अंमली पदार्थ प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांना पुण्यातील आंबेडकर कॉलेजवळ एका कारमध्ये पाच लाख ६४ हजार ५०० रुपये मूल्याच्या बनावट नोटा आढळल्या. त्यानंतर त्यांनी या कारमध्ये असणारे राहुल वचकळ (१९) व शुभम क्षीरसागर (२४) यांच्याविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती.