बेस्टचे खासगीकरण ?; कंडक्टर देखील कंत्राटी पद्धतीने - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 19, 2020

बेस्टचे खासगीकरण ?; कंडक्टर देखील कंत्राटी पद्धतीने

https://ift.tt/3aoQhz3
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई बेस्ट उपक्रमातील चालकांपाठोपाठ कंडक्टरदेखील कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. बेस्टकडून नव्याने ४०० बस भाडेतत्त्वावर घेण्याची तयारी सुरू असून त्यासाठी नवीन धोरण स्वीकारले जात आहे. भाडेतत्त्वावरील बसपोटी कंत्राटदारास सुमारे २ हजार कोटी रुपये मोजले जाणार आहेत. मात्र, कंत्राटी पद्धतीने घेणे म्हणजे बेस्ट उपक्रमाच्या खासगीकरणाचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस, भाजपने विरोध दर्शविला आहे. बेस्ट उपक्रमात दाखल होणाऱ्या बस या संपूर्णत: भाडेतत्त्वावर राहणार आहेत. परंतु, त्या पद्धतीने बस सेवा देताना बेस्टचा चालक हा कंत्राटी पद्धतीने, तर कंडक्टर हा बेस्ट उपक्रमाचा कर्मचारी असेल, असे धोरण राबविण्यात येत होते. मात्र, उपक्रमाने त्या धोरणास छेद देत कंडक्टरदेखील कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजूर झाल्यास पुढील कालावधीत बेस्टमध्ये कंत्राटी स्तरावर कंडक्टर नेमले जातील, अशी टीका केली जात आहे. उपक्रमाच्या प्रस्तावानुसार पुढील १० वर्षांसाठी ४०० बस भाडेतत्त्वावर घेण्यात येतील. त्यासाठी कंत्राटदारास १,९८० कोटी रुपये मोजले जाणार आहेत. या सर्व बस वातानुकूलित असून त्या टप्प्याटप्प्यात सेवेत आणण्याची योजना आहे. बेस्टने याअगोदर १,१०० बस भाडेत्त्ववार घेतल्या असून त्यात आणखी ४०० बसचा समावेश होणार आहे. खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप याप्रकारे बसमध्ये कंत्राटी पद्धतीने कंडक्टर नेमण्याचा डाव म्हणजे बेस्टचे संपूर्ण खासगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप मुंबई पालिकेचे विरोधी पक्षनेते आणि बेस्ट समितीतील काँग्रेसचे सदस्य रवी राजा यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनीही कंत्राटी स्तरावर कंडक्टर घेण्यास विरोध दर्शविताना अशातऱ्हेने खासगीकरण योग्य नसल्याची टीका केली आहे. ६ हजार बसगाड्यांचे उद्दिष्ट बेस्टने येत्या तीन वर्षांत बसगाड्यांची संख्या ६ हजारपेक्षा जास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या ताफ्यात सुमारे ३,६००पेक्षा जास्त बस असून १,१०० बस भाडेतत्त्वावरील आहेत. उपक्रमाने, ६०० बस भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव तयार करून निविदा मागविल्या होत्या. त्यातील दोन निविदा फेटाळल्या गेल्या आहेत.