
म. टा. प्रतिनिधी, मुंबई अभिनेता अर्जुन रामपालची सोमवारी नारकॉटिक्स कंट्रोल ब्यूरोने () सुमारे सहा तास चौकशी केली. त्यामध्ये प्रामुख्याने रामपाल हा अमली पदार्थांचा ग्राहक आहे की ते पुरवणाऱ्या दलालांच्या टोळीतील सदस्य, याबाबत माहिती घेण्यात आली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा विषय समोर आल्यानंतर एनसीबीने मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. त्यामध्येच एनसीबी मुंबईचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वातील चमूने एका नायजेरियन दलालाला अटक केली होती. या दलालाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, अॅजिसिलाओस डिमिट्रिडेस या दलालास लोणावळा येथील रिसॉर्टवर अमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती. नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. अॅजिसिलाओस हा अर्जुन रामपालची मैत्रीण गॅब्रिएलाचा सख्खा भाऊ आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने ९ नोव्हेंबरला अर्जुनच्या खार येथील घरी छापा टाकला होता. त्याच दिवशी त्याची सात तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्याला १३ डिसेंबरला चौकशीचा समन्स पाठवण्यात आले होते. पण त्याने २१ डिसेंबरपर्यंत वेळ मागितल्यावर सोमवारी पुन्हा चौकशी करण्यात आली. एनसीबीतील सूत्रांनी सांगितले की, 'खार येथील छाप्यावेळी अर्जुनकडे प्रतिबंधित औषधे सापडली होती. तसेच काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सही ताब्यात घेण्यात आली होती. त्यासंबंधीच सोमवारी चौकशी करण्यात आली. अर्जुन हा अमली पदार्थांचे सेवन करतो की तो हे पदार्थ पुरवतो, याचा सखोल तपास करण्यासाठीच ही चौकशी करण्यात आली. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत २८ दलालांना अटक केली आहे. काहींना जामीन मिळाला आहे. जवळपास १८ जणांची चौकशी करण्यात आली असून त्यात बॉलिवूडमधील अभिनेत्रींचाही समावेश आहे.