शेअर बाजारात दिवाळी ; सेन्सेक्सने गाठलं ऐतिहासिक ५० हजारांचे शिखर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 21, 2021

शेअर बाजारात दिवाळी ; सेन्सेक्सने गाठलं ऐतिहासिक ५० हजारांचे शिखर

https://ift.tt/3nZ43f7
मुंबई : तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्सने आज गुरुवारी ऐतिहासिक ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. भांडवली बाजाराच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सेंसेक्सने ५० हजारांचे शिखर सर केले. सध्या बाजारात चौफेर खरेदीचा ओघ सुरु आहे. आजच्या सत्रात आयटी, ऑटो , एफएमसीजी, बँका या शेअरमध्ये वाढ झाली आहे.सध्या सेन्सेक्स २६३ अंकांनी वधारला असून ५००५५ अंकावर आहे. निफ्टी ७४ अंकांच्या वाढीसह १४७१९ अंकावर आहे. याआधी बुधवारी सेन्सेक्स ३९३ आणि निफ्टी १२३ अंकांनी वधारला होता. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा ८३४ अंकांच्या वाढीसह ४९३९८ अंकावर स्थिरावला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा २३९ अंकांच्या वाढीसह १४५२१ अंकावर स्थिरावला. बुधवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी किमान तीन लोक कोटींची कमाई केली होती. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी बुधवारी सूत्रे हाती घेतली. यानंतर आर्थिक पॅकेजला गती मिळण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हच्या माजी अध्यक्ष जेनेट येलन यांची ट्रेझरी सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली आहे. येलन यांनी यापूर्वीच करोना रोखण्यासाठी मोठ्या आर्थिक पॅकेजचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढला असल्याचे फेडरल रिझर्व्ह आगामी पतधोरणात काय भूमिका घेते याकडे गुंतवणूकदारांची उत्सुकता लागली आहे.जो बायडन यांच्या हाती सत्ता आल्यानंतर अमेरिकेतील भांडवली बाजारात जल्लोष दिसून आला. बुधवारी अमेरिकेतील सर्वच शेअर बाजार तेजीसह बंद झाले. त्याचे पडसाद आज आशियातील भांडवली बाजारावर उमटल्याचे शेअर दलालांचे म्हणणे आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. शेअर बाजाराच्या माहितीनुसार बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २२८९ कोटींचे शेअर खरेदी केले.तर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ८६४ कोटीचे शेअर विक्री केले. दरम्यान परदेशी गुंतवणुकीचा वाढत ओघ रुपयाला फायदेशीर ठरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी वधारला. बुधवार सलग दुसऱ्या सत्रात रुपया ७३.०५ वर स्थिरावला होता. तेजीचे शिलेदार बजाज फायनान्स, एचडीएफसी , एल अँड टी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एनटीपीसी , एचयूएल, पॉवरग्रीड, इन्फोसिस, मारुती, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले, एसबीआय, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, ओएनजीसी, भारती एअरटेल.