
मुंबई : कमॉडिटी बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे. सोने १४७ रुपयांनी वधारले असून चांदीच्या दरात २८४ रुपयांची वाढ झाली आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन आज सूत्रे हाती घेणार आहेत. यानंतर आर्थिक पॅकेजला गती मिळण्याची शक्यता आहे. तसेच फेडरल रिझर्व्ह आगामी पतधोरणात काय भूमिका घेते याकडे गुंतवणूकदारांची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे सध्या कमॉडिटी बाजारात उलथापालथ दिसून येत आहे. फेडरल रिझर्व्हच्या आज अध्यक्ष जेनेट येलन यांची ट्रेझरी सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली आहे. येलन यांनी यापूर्वीच करोना रोखण्यासाठी मोठ्या आर्थिक पॅकेजचे संकेत दिले आहेत. जागतिक बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव ०.५ टक्कानी वधारला आणि १८४८.३० डॉलर प्रती औंस झाला. डॉलर इंडेक्समध्ये ०.१४ टक्के घसरण झाली. बुधवारी सोने दरात ०.५१ टक्के वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रती औंस १८४९ डॉलर आहे. मात्र गेल्या ३० दिवसांचा विचार करता सोने जवळपास ३२ डॉलरने कमी आहे. सध्याचा भाव महिनाभराच्या तुलनेत १.७० टक्के कमी आहे. चांदीच्या दरात ०.९ टक्के वाढ झाली असून प्रती औंस भाव २५.४२ डॉलर झाला. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४९१९८ रुपये आहे. त्यात २१५ रुपयांची वाढ झाली आहे.चांदीमध्ये ४४८ रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो ६६४८४ रुपये आहे. याआधी सोमवार आणि मंगळवारच्या सत्रात सोने आणि चांदी महागले होते. good returns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८०१० रुपये झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९०१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७८१० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२१६० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६४४० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५०६६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३३० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५११३० रुपये आहे.