
मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या महिलेनं मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं हे वृत्त दिलं आहे. बॉलिवूडमध्ये संधी देतो असं सांगून धनंजय मुंडे यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप रेणू शर्मा हिनं केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं हे आरोप केले होते. रेणू शर्माच्या मोठी बहीण करुणा शर्मा हिच्यासोबत धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोपही तिनं केला होता. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. करुणा शर्मा हिच्याशी संबंध असल्याची कबुली स्वत: मुंडे यांनी दिली होती. तसंच, आपल्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना देखील याची कल्पना असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, रेणू शर्मा हिनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळं ते अडचणीत आले होते. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. हे सगळं घडत असतानाच रेणू शर्मा ही एक ब्लॅकमेलर असल्याच्या आरोप इतर पक्षातील काही राजकीय नेत्यांनीही केला होता. भाजपचे कृष्णा हेगडे व मनसेचे संतोष धुरी यांनीही तिच्यावर आरोप केले होते. तिनं सतत फोन करून आपल्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार हेगडे यांनी पोलिसांत केली होती. त्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं. पोलिसांकडून याबाबत सखोल चौकशी सुरू असतानाच रेणू शर्मा हिनं आता माघार घेतली आहे.