
म. टा. प्रतिनिधी, मुंबई राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या उद्या, सोमवारी (२५ जानेवारी) राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्या दिवशी राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी शनिवारी येथे दिली. या दिवसापासून भारत निवडणूक आयोग ई-मतदार ओळखपत्राचे (ई-ईपिक) वाटप सुरू करणार असून, मतदारांना त्यांचे मोबाइल अथवा कम्प्युटरवर डाउनलोड करता येणार आहे, असे बलदेव सिंह म्हणाले. भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. याचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोग २०११पासून दर वर्षी २५ जानेवारीला '' साजरा करतो. राष्ट्रीय मतदार दिनाचा देशपातळीवरील मुख्य कार्यक्रम भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे, तर राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करतात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान असतील. मुख्य अतिथी म्हणून राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर असणार आहेत. दर वर्षी राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून शाळा महाविद्यालयांमध्ये वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेऊन मर्यादित स्वरूपात हा दिवस साजरा करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.