
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी इंधन दरात वाढ केली आहे. सलग सात दिवस स्थिर राहिल्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ६० डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला. सध्या जवळपास सर्वच शहरांमध्ये पेट्रोलने उच्चांकी पातळीवर गेले आहे.या दरवाढीने आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९३.२० रुपयांवर गेला आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८६.६५ रुपये आहे. सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे इंधन दरवाढीचा भडका उडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यावर तातडीने सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले. कृषी अधिभाराचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार नाही, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. मुंबईत आज गुरुवारी एक लीटर पेट्रोलचा भाव ९३.२० रुपयांवर गेला आहे. एक लीटर डिझेल ८३.६७ रुपये झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८६.६५ रुपये झाला असून डिझेलचा भाव ७६.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८९.१३ रुपये असून डिझेल ८२.०४ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८८.०१ रुपये असून डिझेल ८०.४१ रुपये झाला आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८९.५४ रुपये असून डिझेलचा भाव ८१.४४ रुपये आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत ११ वेळा इंधन दरवाढ झाली आहे. यात पेट्रोल २ रुपये ९४ पैशांनी महागले आहे. तर याच कालावधीत झालेल्या डिझेल दरवाढीने डिझेलमध्ये २.९६ रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात आज गुरुवारी तेजी दिसून आली. कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ०.८५ डॉलरने वधारला आणि तो ५५.९३ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव १ डॉलरने वाढला असून तो ५८.४६ डॉलर झाला आहे. गेल्या काही महिन्यात जागतिक पातळीवर इंधनाची मागणी वाढली आहे. अनलॉकमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येत आहे. तर मध्य पूर्वेत हिमवर्षावामुळे उष्ण वातावरण तयार करण्यासाठी इंधनाचा वापर वाढला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाला मोठी मागणी असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.