मुंबई: एप्रिल-मे, दिवाळीच्या मोठ्या सुट्ट्या लागताच अनेकांच्या घरात, इमारती, व्यावसायिक कार्यालयांमध्ये दुरुस्ती, रंगरंगोटीची कामे हाती घेतली जातात. त्याचवेळी संधीसाधूंकडून पालिकेस तक्रार देण्याचे प्रकार सुरू होते. असे प्रकार बंद होण्यासाठी मुंबई पालिकेने वेगळीच शक्क्ल लढवली आहे. इमारतींसह घरांमधील दुरुस्ती आदी कामांसाठी पालिकेच्या परवानगीची आवश्यता नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यासाठी पालिकेच्या परिमंडळ-३ अंतर्गत येणाऱ्या अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि पश्चिम विभागात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. वाचा: मुंबईत विविध ठिकाणी इमारती, घरांमध्ये दुरुस्ती, रंगकामे, ग्रिलच्या खिडक्या बदलणे वगैरे कामे सुरू असतात. अधिकृत इमारती, चाळी, व्यावसायिक कार्यालयांमध्ये अशाप्रकारे काम हाती घेतल्यानंतर काही वेळा कटू अनुभव येतात. नियमभंग केल्याचे सांगत पालिकेकडे तक्रार करण्याचे प्रकार होतात. प्रत्यक्षात अधिकृत असलेल्या ठिकाणी दुरुस्तीसह इतर कामांना कोणतीही आडकाठी नसते. अशा प्रकारच्या कामांना पालिकेच्या मंजुरीची आवश्यकता नसते. ही बाब सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालिकेच्या परिमंडळ-३ने पुढाकार घेतला आहे. विकास आराखडा-२०३४मध्येही इमारत, घरांतील दुरुस्ती वा इतर कामांसाठीही परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे पालिकेने नमूद केले आहे. वाचा: 'परिमंडळ-३मधील अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिममध्ये जनजागृतीचा प्रयोग हाती घेतला जात आहे. सुरुवातीला इथल्या पालिका कार्यालयांमध्ये माहितीफलक लावले गेले. त्यानंतर विभागांमधील इमारती, सार्वजनिक ठिकाणी असे फलक ठेवले जातील', असे परिमंडळ-३चे उपायुक्त पराग मसुरकर यांनी स्पष्ट केले. कोणत्या कामांसाठी परवानगी घेताना कोणती कागदपत्रे लागतात, त्याची पूर्तता, कालावधी आदी गोष्टी सोप्या भाषेत समजावण्याचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले. केवळ दुरुस्तीपुरताच मुद्दा मर्यादित न ठेवता इमारतींच्या गच्चीवर सौरउर्जेचे पॅनेल बसविण्यासाठीही पालिका परवानगी गरजेची नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वाचा: