मटा संवादः दीडदमडी : टोक आणि खिळा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 7, 2021

मटा संवादः दीडदमडी : टोक आणि खिळा

https://ift.tt/3q9Y60R
टोकदार असणे, टोक गाठणे आणि टोचणे हा खिळ्यांचा गुणधर्म आहे. केंद्रातल्या सरकारला या तिन्ही गोष्टी प्राणप्रिय आहेत. आंदोलक आणि सरकार हे दोघेही टोकाची भूमिका घेत असल्याचा आरोप एकमेकांवर करत होतेच. आता सरकारच्या वतीने, कायदा राखणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळ्यांची पेरणी करून, सुव्यवस्थेचे खरे खुरे टोक गाठले आहे. दिल्लीच्या सीमा कमी पडल्या म्हणून की काय, थेट ग्रेटा थनबर्गवर एफआयआर दाखल करून, दिल्ली पोलिसांनी आपली टोकदार भूमिका आंतरराष्ट्रीय केली आहे. 'खिळ्यासाठी नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला आणि एवढा अनर्थ एका खिळ्याने केला,' हे बरीच वर्षे माहिती होते; परंतु मुळात तो खिळा गेला कुठे, याचा शोध काही केल्या लागत नव्हता. बरेचसे शोध आधी तिकडे युरोपात-पश्चिमेकडे लागतात आणि मग ते आपल्या पुराणांमध्ये लागतात, असे आजवर वारंवार अनुभवाला आलेले असल्याने, खिळ्याचा शोधही आधी इंग्रजीत घेतला, तर तिथे 'लास्ट नेल ऑन द कॉफिन' सापडले. म्हणजे, तिकडेही एकच खिळा शिल्लक होता. या 'लास्ट नेल ऑन द कॉफिन'चा अर्थाअर्थी भारताशी, आपल्या सरकारशी काहीही संबंध नाही. या आंदोलनाविषयीची सरकारची भूमिका म्हणजे 'लास्ट नेल ऑन द कॉफिन' आहे, वगैरे अर्थ कोणी काढू नये. विदेशातले नामवंत या देशातल्या आंदोलनाविषयी बोलतात, म्हणून लगेचच आपण विदेशी म्हणी भारतात लागू करणे बरोबर नाही. उलट, याच अर्थाची म्हण इथे तयार करताना, त्यात 'उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी' असा बदल करून घेऊन, आपण खिळ्याला काडीचीच किंमत देतो, हे आपण दाखवून दिले आहे. ज्या खिळ्यासाठी आधी नाल, मग घोडा आणि पाठोपाठ घोडेस्वारही गेला, त्या खिळ्याचा शोध अखेर दिल्ली पोलिसांनी लावला, हे पाहून मात्र त्यांच्याविषयीच्या कौतुकाने हृदय भरून आले. हे आंदोलन सरकारला फार टोचत होते, हे दिसत होते; परंतु हे टोचणे सरकार शब्दशः घेईल, असे वाटले नव्हते. आदल्याच दिवशीच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी ज्या शेतकऱ्यांना झाडावर चढवले, त्यांना लगेचच दुसऱ्या दिवशी झाडावरून खाली उतरवून, त्यांच्या मार्गात आकाशाकडे टोक केलेले बलदंड खिळे ठोकून बंदोबस्त केल्याने, चांगलाच सामाजिक समतोल साधला गेला. तशीही खिळा ही बहुपयोगी वस्तू आहे. साहित्य व्यवहारापासून, ते अगदी रोजीरोटी कमावण्याच्या अभिनव पर्यायापर्यंत अनेक गोष्टी खिळ्यांमुळे साध्य तरी होतात अथवा खिळ्याच्या स्वाभाविक प्रकृतीतून जन्माला तरी येतात. मराठी साहित्यात ज्यांना आख्यायिकेचे स्थान प्राप्त झाले आहे, ते 'श्री.पु' सत्यकथेसाठी लेख, कथा पाठवणारांना सतत 'टोक नाही' किंवा 'टोक काढा' म्हणत टोकायचे. टोक हा शब्द त्यांना खिळा पाहूनच सुचला असावा, यात संशय असण्याचे कारण नाही. त्यांच्या प्रेसमध्ये खिळे जुळवून मजकूर कंपोज केला जात असताना, तिथल्या लोकांनाही ते अनेकदा टोक काढा म्हणून सांगायचे. लेखकाला काढता नाही आले, तर किमान कंपोजर तरी काढेल, असे त्यांना वाटत असे; परंतु अक्षराला नसलेले टोक कंपोजिंगच्या खिळ्यांनाही नसल्याने, 'श्री.पुं' ची मागणी त्यांना पूर्ण करता येत नसे. अर्थात, पुढे 'श्री.पुं'बद्दलच्या दंतकथांनी मात्र टोक गाठले, हे खरे आहे. तशी साहित्यात आणखीही काही उदाहरणे सापडतील. भौतिकशास्त्र शिकवताना एखाद्या प्रयोगात खिळ्याची टोकदार सावली पाहूनच रंगनाथ पठारे यांना 'टोकदार सावलीचे वर्तमान' हे शीर्षक सुचले असणार. एकदा शीर्षक सुचले, की मग कादंबरी लिहायला काही वेळ लागत नाही. रोजीरोटी कमावण्याच्या अभिनव पर्यायाचा उल्लेख आधी केलेला आहे; त्याचा खिळ्याशी काय संबंध, असा अनेकांना प्रश्न पडला असेलच, त्याचेही उत्तर आहे. महामार्गाने प्रवास करीत असताना अचानक गाडीचे टायर पंक्चर होते, टायरमध्ये खिळा घुसल्याचे दिसते आणि लगेचच काही मीटर अंतरावर एखाद्या भिंतीवर 'पंक्चर निकालनेके लिये मोबाइल नंबर...' असे मोडक्या तोडक्या अक्षरात लिहिलेले दिसते. हाच तो अभिनव मार्ग. थोडक्यात, दिल्ली पोलिसांनी खिळ्यांचा उपयोग करण्याआधीच, खिळा आपल्या व्यवहारात खोलवर घुसलेला आहे. 'सारा अनर्थ एका ट्रॅक्टर रॅलीने केला' याची खूणगाठ बांधून, पोलिसांनी ट्रकच्या मार्गावर प्रत्यक्ष टोकदार खिळ्यांची पखरण केली. बाकी खिळ्याचा हा गुणधर्म हल्ली सर्वत्रच दिसून येतो. त्यातही सरकारे, राजकीय पक्ष आणि त्यांचे पाठीराखे यांच्यात तर हल्ली फेसबुकवर 'तू अधिक टोकदार, की मी अधिक टोकदार' अशी स्पर्धाच लागलेली असते. अर्थात, ही स्पर्धा 'टीटीजी-एमएमजी', म्हणजे 'तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी' अशा स्वरूपाची असल्याने, प्रत्यक्ष सीमेवर शांतताच असते. राजकीय पक्ष असल्या 'टोकांना' स्पॉन्सर करून, पाळून, अथवा वैचारिक भूल देऊन, आतून चिथावण्या देत असतात असे म्हणतात; परंतु कोणाहीकडे याबाबतचे तसे टोकदार पुरावे नाहीत. भाजपच्या पाठीराख्या म्हणून स्वतःच स्वतःला प्रसिद्ध केलेल्या एका बाईंनी काही दिवसांपूर्वी ट्विट करताना असेच टोक गाठले होते. कमळ चिखलातच उगवते हे सिद्ध करण्याचा त्यांचा हा आटपिटा म्हणजे, खरे तर त्यांच्यासाठी 'लास्ट नेल ऑन द कॉफिन' ठरू शकला असता; परंतु प्रत्यक्षात असा शेवटचा खिळा ठोकला जातो, तेव्हा ते ना नेलला माहिती असते, ना कॉफीनला. ते केवळ खिळे ठोकणाऱ्यालाच माहिती असते. 'भगवानकी लाठी जशी बेआवाज असते,' तशीच लास्ट नेल ठोकणाऱ्याची हातोडीही बेआवाज असते. तर, अवघ्या समाजालाच टोके आलेली असताना, 'एवढा अनर्थ एका खिळ्याने केला', हे समजेल तेव्हा समजेल. तूर्तास दिल्ली पोलिसांनी सरकारची संघर्षाची भूमिका टोकदारपणे सांगण्याचा एवढा सहज-सोपा प्रतीकात्मक मार्ग सांगितला, त्यावरून त्यांची बुद्धी किती अणकुचीदार आहे, हे सिद्ध होते. -