
म. टा. प्रतिनिधी, मुंबई ट्रक किंवा टेम्पोमध्ये सामान भरून वाहन निघाले की त्या वाहनाला २४ तासांत २०० किलोमीटर अंतर पूर्ण करावेच लागेल. अन्यथा त्या वाहनातील सामानासाठी काढण्यात आलेले जीएसटी विभागाचे 'ई-वे' बिल रद्द होईल व त्यावर भरमसाठ दंड भरावा लागेल. जीएसटी कायद्यात मालवाहतूकदारांसाठी 'ई-वे बिल' ही संकल्पना आहे. त्याअंतर्गत एखाद्या ठिकाणाहून सामान घेऊन माल ट्रक किंवा टेम्पो निघाला की, ते वाहन कुठल्या प्रकारचे, किती सामान, कुठे घेऊन जाणार, याची ऑनलाइन नोंद करावी लागते. त्याआधारे जीएसटी विभागाकडून 'ई-वे बिल' दिले जाते. हे बिल घेऊन वाहन चालकाला प्रवास करावा लागतो. हे वाहन जीएसटी विभागाच्या गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी रस्त्यात कोठेही अडवू शकतात. त्यावेळी दाखवणे अनिवार्य असते; परंतु यामध्ये आता केलेला बदल लाखो मालवाहतूकदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याबाबत अखिल भारत व्यापारी महासंघाचे (कॅट) मुंबई प्रदेशाध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले, 'याआधी वाहन एखाद्या ठिकाणाहून निघाले की त्याला ई-वे बिल घेऊन पुढील २४ तासांत १०० किलोमीटर अंतर कापण्याची मुभा होती. आता हेच अंतर २०० किमी करण्यात आले आहे. मुंबईत येणारे अनेक ट्रक, टेम्पो नवी मुंबईतून येतात. मुंबईत अनेक ठिकाणी त्यांना दिवसा प्रवेश नसतो. कुठे नाकाबंदी लागते, कुठे वाहतूक कोंडी होते, अशावेळी हे वाहन २४ तासांत २०० किमीपर्यंतच्या इच्छित स्थळी पोहोचणे फारच अवघड असते. २४ तासांत वाहन तिकडे पोहोचले नाही तर ई-वे बिल रद्द होते. मग पुन्हा कर परतावाही गेला व दुप्पट दंडाचा ससेमिरा मागे लागतो.'