
चेन्नई: इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्याच्या मालिेकत १-०ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत तीन बदल केले आहेत. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने संघात तीन बदल केल्याचे सांगितले. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ज्या खेळाडूला घेतले नाही म्हणून टीका झाली होती अखेर त्याला संघात घेण्यात आले आहे. फिरकीपटू कुलदीप यादवचा संघात समावेश झाला आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी त्याचा समावेश केला गेलाय. त्याच बरोबर संघातील अनुभवी जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजला संधी दिली आहे. भारतीय संघातील तिसरा बदल म्हणजे शाहबाद नदीमच्या जागी संघात अक्षर पटेलचा समावेश केला गेलाय. पहिल्या कसोटी दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या अक्षरचा संघात समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेलची हे कसोटीतील पदार्पण आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने २२७ धावांनी शानदार विजय मिळवला होता. चार सामन्यांच्या मालिकेत इंग्लंने १-०ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. फक्त या मालिकेत नव्हे तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला विजय गरजेचा आहे. असा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज