केंद्र सरकारची संसदेत कोंडी ; इंधन दरवाढीबाबत पेट्रोलियम कंपन्यांचा सावध पवित्रा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 10, 2021

केंद्र सरकारची संसदेत कोंडी ; इंधन दरवाढीबाबत पेट्रोलियम कंपन्यांचा सावध पवित्रा

https://ift.tt/30qkiIC
नवी दिल्ली : मागील दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरमध्ये झालेल्या भरमसाठ दरवाढीने सलग दोन दिवस संसदेत विरोधकांनाही केंद्र सरकारला घेरले आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलग अकराव्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. इंधन दरवाढीवरून याआधीच केंद्र सरकारला विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. सोमवारी आणि मंगळवारी इंधन दरवाढीवरून संसदेत प्रचंड गदारोळ दिसून आला. विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले. यामुळे संसदेचे कामकाज ठप्प झाले होते. या सर्व घडामोडी पाहता पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. आज बुधवारी मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर कायम आहे. एक लीटर ८८.६० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१७ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९१.३५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.३५ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.२२ रुपये असून डिझेल ८६.३७ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.७६ रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९९.२१ रुपयांवर स्थिर आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचा भाव सहा डॉलरने वधारला होता. आज बुधवारी मात्र तेलामध्ये नफावसुली दिसून आली. सिंगापूरमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.८३ डॉलरची घट झाली आणि प्रती बॅरल भाव ६३.९६ डॉलर झाला. सोमवारी ब्रेंट क्रूडने सुमारे वर्षभरानंतर ७० डॉलरची पातळी ओलांडली होती. आज ब्रेंट क्रूडचा भाव ०.७२ डॉलरने घसरला आणि ६७.५२ डॉलर झाला.