ग्राहकांना दिलासा ; चर्चेअंती 'या' बॅंकेचा संप टळला, नेहमीप्रमाणे आज कामकाज होणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 12, 2021

ग्राहकांना दिलासा ; चर्चेअंती 'या' बॅंकेचा संप टळला, नेहमीप्रमाणे आज कामकाज होणार

https://ift.tt/3viO3JK
मुंबई : बँक व्यवस्थापनाने पुरेशी नोकरभरती करावी या प्रमुख मागणीसाठी बँक आॅफ महाराष्ट्रमधील कामगार संघटनेने पुकारलेला आजचा एक दिवसीय संप टळला आहे. प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर संप तूर्त स्थगित करण्याचा निर्णय कामगार नेत्यांनी घेतला. ( All India Employees Federation has deferred its Strike proposed on 12th March 2021) त्यामुळे आज शुक्रवारी १२ मार्च २०२१ रोजी बँक आॅफ महाराष्ट्रच्या देशभरातील शाखांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहील, असे कामगार संघटनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्र बँकेत अकराशे पेक्षा जास्त शाखेतून कायमस्वरुपी सफाई कर्मचारी नाहीत तर सहाशे पेक्षा जास्त शाखेतून कायम स्वरूपी शिपाई नेमले गेलेले नाहीत. बँकेने गेल्या पाच वर्षंपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती यामुळे रिकाम्या झालेल्या क्लार्कच्या जागा भरलेल्या नाहीत त्या अंदाजे एक हजारपेक्षा जास्त जागा आहेत. याशिवाय नवीन शाखा उघडल्या, व्यवसायात वाढ झाली यामुळे रिकाम्या झालेल्या जागांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नोकर भरती करावी या मागणीसाठी देशभरातील १९०० पेक्षा जास्त शाखेतून काम करणारे 'एआईबीइए' चे सहा हजारावर सभासद दिनांक १२ मार्च रोजी एक दिवसाच्या देशव्यापी लाक्षणिक संपावर जाणार होते. मात्र पुण्यातील कामगार आयुक्तांच्या पुढाकाराने नुकताच ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे प्रतिनिधी आणि महाबँक व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत कामगारांच्या काही मागण्यांबाबत व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा पुढे सुरु ठेवण्याचे आश्वासन कामगार संघटनांना देण्यात आले. त्यावरून कामगार संघटनांनी आजचा १२ मार्च रोजीचा एक दिवसाचा संप तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आज १२ मार्च रोजी देशभरातील बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहील तर १५ आणि १६ मार्च रोजी सर्व कामगार संघटनांनी पुकारलेल्या सार्वजनिक बँकांच्या संपात बँक ऑफ महाराष्ट्राचे सर्व कमर्चारी सहभागी होतील, असे ऑल इंडिया एम्प्लॉइज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी स्पष्ट केले. या पूर्वी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात संघटनेतर्फे मागणी दिवस पाळण्यात आला. निदर्शने, धरणे, मास डेप्युटेशन इत्यादी कार्यक्रम संघटित करण्यात आले. ५ मार्च रोजी रिजनल लेबर कमिशनर, पुणे यांनी देखील संघटनेच्या मागण्या योग्य ठरवत बँकेने त्या मान्य कराव्यात असा सल्ला बँकेला देत आता १० मार्च रोजी समेटासाठी अंतिम बैठक बोलावली होती.