मुंबई : भांडवली बाजारातील तेजीला आज ब्रेक लागला आहे. जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे. आज बँका आणि वित्त संस्था, ऑटो या क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर ३० पैकी २५ शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर केवळ पाच शेअर तेजीत आहेत. ज्यात ओएनजीसी, टेक महिंद्रा, इन्फोसिस, सन फार्मा आणि पॉवरग्रीड या शेअरमध्ये वाढ झाली आहे. सध्या सेन्सेक्स ६६३ अंकांनी घसरला असून तो ५०७८१ अंकावर आहे. तर १९८ अंकांच्या घसरणीसह १५०४७ अंकावर आहे. एचडीएफसी, एसडीएफसी बँक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक , ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, एल अँड टी , बजाज फायनान्स, टीसीएस, एसबीआय या शेअरमध्ये घसरण झाली आहे. गेले तीन दिवस बीएसई आणि एनएसईमध्ये तेजीचा बोलबाला होता. मागील तीन दिवसात सेन्सेक्सने जवळपास १५०० हून अंकांची कमाई केली होती. मात्र आज सकाळपासूनच या तेजीला नफेखोरीचे ग्रहण लागले आहे. दरम्यान, बुधवारी अमेरिकेतील झाली. बेरोजगारी वाढल्याने अमेरिकन अर्थव्यवस्था अजूनही मंदीच्या कचाट्यात असल्याने गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून पैसे काढून घेतली. त्याचे पडसाद आज आशियातील प्रमुख शेअर बाजारांवर उमटले. जपान, कोरिया, हाँग काँग, आणि चीनमधील भांडवली बाजारात घसरण झाली आहे. बुधवारी सेन्सेक्सने ५१००० अंकाचा टप्पा ओलांडला होता. बाजार बंद होताना सेन्सेक्स ११४८ अंकाच्या वाढीसह ५१४४४ अंकावर स्थिरावला. तर निफ्टी ३२६ अंकांच्या वाढीसह १५२४५ अंकावर बंद झाला होता. या तेजीत गुंतवणूकदारांनी तीन लाख कोटींची कमाई केली होती. कालच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी २०८९ कोटीची गुंतवणूक केली होती. गुंतवणुकीसाठी खुल्या झालेल्या एमटीएआर टेक्नोलॉजिजच्या समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद दिला आहे. आज पाहिल्याच दिवशी आयपीओ ३.६८ पटीने सबस्क्राईब झाला आहे. ५ मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना शेअर खरेदीसाठी अर्ज करता येईल.