जॉज हेबर जोसेफ, मुंबई : मिडकॅप कंपन्या या नवीन वाढणारे व्यवसाय असून त्या सध्या त्यांच्या उच्चवाढीच्या मार्गाकडे वाटचाल करत आहेत. लार्ज कॅपपेक्षा अधिक वाढीची संधी आणि स्मॉल कॅपच्या तुलनेत कमी जोखीम यामुळे लार्ज कॅप ते स्मॉल कॅप यामध्ये मिडकॅप कंपन्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या कंपन्या आहेत. कंपन्या त्यांच्या आयुष्यभराच्या वाटचालीदरम्यान याच टप्प्यादरम्यान उत्तम वाढ आणि उच्च परतावा मिळवतात. याच टप्प्यावर आपण उद्याचे विजेते शोधुन काढू शकतो आणि त्यांच्या यशोगांधाआधारे आपणही त्यांच्या यशावर स्वार होऊ शकतो. म्हणूनच दीर्घकालीन वाटचालीत संपत्ती निर्मितीसाठी मिडकॅप कंपन्या हा शेअरबाजारातील अतिशय उत्तम गुंतवणूक प्रकार आहे. भारतीय अर्थव्यवस्था गेल्या चार वर्षात अनेक सुधारणांना सामोरे गेली आहे. सुधारणांची ही वाटचाल नोटबंदी, दिवाळखोरी नियमावली, जीएसटी, रेरा आणि कंपनी करातील कपात अशा क्रमाने पुढे सरकली आहे. त्याचा व्यवसाय करण्याच्या पध्दतीवर म्हणजेच कंपन्यांवर व्यापक परिणाम झाला आहे. अनेक उद्योगक्षेत्र आणि उद्योगांना गेल्या दहा वर्षात मंदीतून वाटचाल करावी लागली आहे. या बदलांचा सर्वाधिक परिणाम हा लार्जकॅपपेक्षा मिडकॅप कंपन्यांवर अधिक झालेला आहे. नवीन आर्थिक वातावरणांशी जुळवून घेतल्यानंतर मिडकॅप कंपन्या पुन्हा उभारी घेत आहेत. मिडकॅप कंपन्या लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत आपल्या वाटचालीदरम्यान उत्तम कामगिरी आणि निराशाजनक कामगिरी या दोन्ही टप्प्यातून मार्गक्रमण करत असतात. विशेषतः निराशाजनक कामगिरीच्या टप्प्यानंतर या कंपन्या जोमदार कामगिरीच्या टप्प्यात दाखल होत पुढे पुढे जातात. सध्या मिडकॅप कंपन्या तीन वर्षाच्या निराशाजनक कामगिरीच्या टप्प्यातून बाहेर पडत आहेत. आगामी तीन ते पाच वर्षात या कंपन्या चमकदार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. बाजाराचे धुव्रीकरण होताना काही कंपन्यांचे शेअर तसेच काही उद्योग क्षेत्र हे घसघशीत परतावा देताना दिसत आहेत, तर बऱ्याच मिडकॅप कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित उद्योगक्षेत्रे निराशाजनक कामगिरी करताना आढळत आहेत. २०१८-२०२० या कालावधीत काही निवडकच मिडकॅप कंपन्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. तर बहुतांश मिडकॅप कंपन्यांमुळे निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांकाने निराशाजनक कामगिरी केलेली आहे. याच कंपन्या आता अतिशय आकर्षक किंमतीना गुंतवणूकीसाठी उपलब्ध आहेत. हा विरोधाभास शेअर निवडीची उत्तम संधी गुंतवणूकदारांना देत आहे. मिडकॅप क्षेत्रात आमचे लक्ष हे अधिक वृध्दीची क्षमता असलेले नवीन उद्योग क्षेत्र, मोठ्या उद्योगक्षेत्रात बाजारातील हिस्सा मिळविणाऱ्या अथवा बाजारात आपले विशिष्ट स्थान निर्माण करणाऱ्या कंपन्या, संघटित क्षेत्रात रुपांतरित झाल्याचा लाभ मिळणाऱ्या कंपन्या तसेच आत्मनिर्भर भारत आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सरकारने आखलेल्या धोरणांचा फायदा मिळणाऱ्या अनेक कंपन्यांवर आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात वृध्दीवरही अधिक भर देण्यात आलेला असून त्यामुळे जवळपास बारा वर्षानंतर कंपन्यांच्या नफ्यातील वृध्दी पहावयास मिळत आहे. व्यापार चक्रात अडकून पडलेलल्या कोणत्या कंपन्या बाहेर येत आहेत तसेच त्यांचे शेअरमुल्य किती आकर्षक आहे, यावरही आमचा गुंतवणूकीवेळी भर राहणार आहे. मिडकॅप कंपन्या विशेषतः व्यापार चक्राशी संबंधित क्षेत्रातील कंपन्या या सध्या त्यांच्या दीर्घकालीन सरासरी मुल्यापेक्षाही कमी मुल्यपातळीवरच रेंगाळत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत आणखी वाढीच्या अपेक्षेने या कंपन्यांच्या नफ्यातील भरारीची शक्यता दिसत आहे. त्यामुळे नफ्यात उत्तम वाढ आणि दीर्घकालीन सरासरी मुल्यापेक्षाही कमी पातळीवरुन दीर्घकालीन सरासरी मुल्याच्याही वर सरकण्याचा दुहेरी लाभ आजच्या घडीला मिडकॅप कंपन्या दाखवत आहेत. परिणामी मध्यम ते दीर्घकाळासाठी मिडकॅप कंपन्यातील गुंतवणूक आकर्षक परतावा मिळवून देईल, असा आमचा अंदाज आहे. आगामी पाच वर्षात जोखीमेशी संबंधित परतावा अंत्यंत आकर्षक राहू शकतो आणि संपत्ती निर्माण करण्याची सुवर्णसंधीही देत आहे. (लेखक आयटीआय म्युच्यूअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी असून लेखातील त्यांची मते वैयक्तिक आहेत.)