
मुंबई/ : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह ३३ जणांवर अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासाकरता वर्ग करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे परमबीर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परमबीर यांच्यासह ३३ जणांविरोधात अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करून ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंह यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालकांकडे केली आहे. परमबीर यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी भीमराव घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी (ऑनलाइन तक्रार) कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. यामध्ये पराग मणेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण ३३ जणांचा समावेश आहे. या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून, या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलीस करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.