संतापजनक! मास्क न घालणाऱ्यांची दादागिरी; कारवाई पथकावर सोडले कुत्रे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 29, 2021

संतापजनक! मास्क न घालणाऱ्यांची दादागिरी; कारवाई पथकावर सोडले कुत्रे

https://ift.tt/3aNYdt2
म. टा.वृत्तसेवा, कल्याण : वाढत्या करोना संसर्गाला रोखण्यासाठी महत्त्वाचा असलेला मास्क घालण्यास नागरिक टाळाटाळ करत आहेत. अशा नियम मोडणाऱ्या नागरिकांवर पालिकेच्या पथकाकडून कारवाई केली जाते. मंगळवारी संध्याकाळी महापालिकेचे कर्मचारी डोंबिवलीतील खंबाळपाडा रोडवर विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. त्यावेळी एका गॅरेजसमोर तिघांनी या पथकाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला विरोध करत पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर पाळलेले कुत्रे सोडल्याचा संतापजनक प्रकार घडला. या कुत्र्यांनी पथकातील अनिल तायडे या पोलिस शिपायाच्या पायाचा चावा घेत लचके तोडल्याने ते गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात आनंद गुप्ता, सत्यनारायण गुप्ता आणि आदित्य गुप्ता यांच्याविरोधात पालिका कर्मचारी दिगंबर वाघ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर आदित्य पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. पालिका कर्मचाऱ्यांची विविध पथके महापालिका क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. मंगळवारी संध्याकाळी खंबाळपाडा रोडवरील गणेश ऑटोमोबाइल्स हे गॅरेज सुरू ठेऊन तिघेजण या दुकानासमोर विनामास्क बसलेले दिसून आल्याने दिगंबर वाघ यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकत दंड भरण्यास सांगितले. मात्र, या तिघांनी या पथकाला शिवीगाळ व धक्काबुक्की करत दंड भरण्यास नकार दिला. यानंतर पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी त्यांना गॅरेजमध्ये असलेल्या दोन्ही पाळीव कुत्र्यांना बाहेर काढून दुकान बंद करण्यास पुन्हा एकदा सांगितले असता त्यांनी या कुत्र्यांना पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर सोडले. यातील एका कुत्र्याने अनिल तायडे या पोलिस कर्मचाऱ्याच्या पोटरीचा लचका तोडल्याने ते रक्तबंबाळ झाले. यानंतर महापालिका कर्मचारी आणि इतर पोलिस कर्मचारी या तिघांना पकडून पोलिस ठाण्यात नेत असताना यातील आदित्य गुप्ता हा तरुण पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. सत्यनारायण गुप्ता आणि त्याचा दुसरा मुलगा आनंद गुप्ता या दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांनी दिली.