
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी मुंबईला येण्यास वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांनी नकार दिला आहे. शुक्ला यांनी यासाठी करोनाचे कारण पुढे केले आहे. इतकेच नाही, तर चौकशीदरम्यान विचारण्यात येणारे प्रश्न आणि एफआयआरची प्रत पाठवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शुक्ला चौकशीसाठी अनुपस्थित राहिल्याने पुढे कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य गुप्तचर विभागाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने जबाब नोंदविण्यासाठी रश्मी शुक्ला यांना सायबर पोलिसानी समन्स धाडले. शुक्ला यांना बुधवारी त्यांच्या मुंबईतील यशोधन या निवासस्थानी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. दिले करोनाचे कारण पोलिसांच्या या समन्सला शुक्ला यांनी लेखी उत्तर दिले असून मुंबईत करोनाचा संसर्ग वाढत असल्याने येऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, या संदर्भात दाखल एफआयआरची प्रत आणि चौकशीदरम्यान विचारण्यात येणारे प्रश्न ई-मेल करावेत. त्यांची उत्तरे लिहून पाठवते असे त्यांनी नमूद केले आहे.