
नवी दिल्ली : देशात करोना संक्रमणाचा वेग काही कमी होताना दिसत नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाच्या चिंतेत मोठी भर पडलीय. अनेक राज्यांत वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लागू केल्यानंतरही कोविड १९ चा प्रकोप काही आटोक्यात येताना दिसत नाही. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत करोना परिस्थितीवर चर्चा केली. पंतप्रधानांनी लसीकरणावर जोर देण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गुरुवारी (६ मे २०२१) रेकॉर्डब्रेक ४ लाख १४ हजार १८८ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३९१५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल ३ लाख ३१ हजार ५०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ३४ हजार ०८३ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१
- उपचार सुरू : ३६ लाख ४५ हजार १६४
- एकूण मृत्यू : २ लाख ३४ हजार ०८३
- करोना लसीचे डोस दिले गेले : १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ०५८