
अमरावती : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. अशात अनेक चिमुरड्यांनी आपलं छत्र गमावलं, अशा अनाथ मुलं - मुलींना दत्तक घ्या असं आवाहन करणारे पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपण अनेकदा असे पोस्ट वाचून भावूक होतो. पण काही जण खरंच अशा मुलांना दत्तक घेण्याचा विचार करतात. तुम्हीही अशा विचारात असाल तर थांबा आणि आधी ही बातमी वाचा. खरंतर, मुलं दत्तक घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सोशल मीडियावर काही चुकीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याद्वारे दत्तक मुलं हवी असल्यास संपर्क साधा असंही पोस्टमध्ये लिहलं आहे. मात्र, ही बाब बेकायदेशीर असल्याचं जिल्हा महिला व बाल विकास, अधिकारी अतुल भडंगे यांनी स्पष्ट केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका व्हायरल पोस्टमध्ये 3 वर्षांची मुलगी तर दुसरी 6 दिवसांची असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाने दोघींचे आई-वडील मरण पावले. ते अनाथ असल्याने त्यांना दत्तक घेण्यासाठी मोबाईल क्रमांकवर संपर्क साधण्याचं आवाहन पोस्टमधून करण्यात आलं आहे. पण त्या नंबरवर संपर्क साधला असता हा प्रियांका नामक महिलेचा असून नंबर बंद असल्याचं मटाचा पाहणीत समोर आलं आहे. यामुळे आता अवैधरित्या सामाजिक प्रसारमाध्यमाचा उपयोग करून मुलं परस्पर दत्तक देणाऱ्या व्यक्तीबाबत कारवाई करण्यात येत आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून मुलं दत्तक दिली जात नाही. कायद्याने हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही माहितीवर आणि पोस्टवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका, याने तुमची फसवणूकदेखील होऊ शकते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यू झाला आणि कोणीही नातेवाईक बालकास स्वीकारण्यास तयार नसेल तर अशा बालकांना छत्र मिळवून देण्यासाठी 8308992222/ 7400015518 या हेल्पलाईनला सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत संपर्क करावा किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी केलं आहे.