
मुंबई : देशात दैनंदिन करोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर कमॉडिटी बाजारात त्याचे पडसाद उमटले आहेत. आज सोन्याचा भाव ३०० रुपयांनी वधारला असून पुन्हा ४७००० रुपयांवर गेला. चांदीमध्ये देखील आज ५६० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या घसरणीतून सोने आता सावरले आहे. सलग दोन सत्रात सोन्याच्या दरात ३५० रुपयांची वाढ झाली. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव २३३ रुपयांच्या तेजीसह ४६९७० रुपयांवर आहे. त्याआधी तो ४७०७१ रुपयांपर्यंत वाढला होता. शुक्रवारी सोने ५९ रुपयांनी महागले आणि ४६७८५ रुपयांवर बंद झाले. गेल्या सोने आठवडाभरात १५०० रुपयांनी स्वस्त झाले होते. आज चांदीच्या किमतीत देखील तेजी दिसून आली आहे. सध्या ६८६३३ रुपये असून त्यात २६७ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी चांदीने ६८९२७ रुपयांपर्यंत मजल मारली होती. शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव ६८४२३ रुपयांवर बंद झाला. त्यात २१४ रुपयांची घसरण झाली होती. Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४३६० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४५३६० रुपये आहे. त्यात २०० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५५७० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९७७० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४११० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८११० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१०० रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव १७६७. १२ डॉलर प्रती औस इतका आहे. चांदीमध्ये देखील ०.६ टक्के घसरण झाली असून चांदीचा भाव २५.९४ डॉलर प्रती औंस आहे. देशात करोनाने स्थिती किती गंभीर होत चालली आहे याचा अंदाज तुम्हाला आकडल्यांवरून ( coronavirus india ) घेता येईल. करोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या जगातील ५० देशांतील करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या एकत्र केल्यास ती ३.९१ लाख इतकी आहे. तर गेल्या २४ तासांच भारतात आढळून आलेल्या नवीन रुग्णांची संख्या ही ३ लाख ९२ हजार ४५९ इतकी आहे. म्हणजेच ५० देशांमधील करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या एकत्र केली तरी त्याहून अधिक संख्या ही एकट्या भारतात आहे.