'फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 15, 2021

'फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय'

https://ift.tt/3eQvt5A
मुंबई : फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला नवाब मलिक यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा! असा सल्लाही नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे. त्यांच्या या टीकेमुळे भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरंतर, राज्यात करोनाची परिस्थिती, लसीकरण, ऑक्सिजन, लॉकडाऊन आणि मराठा आरक्षण यामुळे सत्ताधारी आणि विरोधक असा सामना पाहायला मिळत आहे. अशात वारंवार आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरूच आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यालाच नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देताना इंद्रा साहनी निवाड्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या फेरविचाराचीही विनंती केंद्र सरकारने केली पाहिजे, अशी अपेक्षा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती. त्यावरून फडणवीस यांनी टोला हाणला होता. केंद्रानेच सगळं करायचं आणि आम्ही मात्र राज्यात माशा मारत बसणार व दिलेलं आरक्षण गमावून बसणार, हे आणखी किती दिवस चालणार आहे?, असा सवाल फडणवीस यांनी केला होता. ५० टक्क्यांवरचं आरक्षण राज्याने दिलं होतं. त्यामुळे याविरोधात पुनर्विचार याचिका केंद्र कशी करणार?, असा सवाल करतानाच अशोक चव्हाण यांनी जरा कायदा समजून घ्यावा, असा खोचक सल्ला फडणवीस यांनी दिला. यावर आता नवाब मलिक यांनी निशाणा साधला असून यामुळे राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याची चिन्ह आहेत.